होळीच्या पूर्वसंध्येला होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाटपासह आदिवासीवाडी घेतली दत्तक
सिटी बेल • राकेश खराडे • रसायनी •
ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील हातनोली आदिवासी वाडीत होळी निमित्ताने वस्तूंच्या वाटपाबरोबर आदिवासीवाडी दत्तक घेण्याचा उपक्रम कला शिल्पकार रुपाली पाटोळे यांनी केला आहे.
चौक-कर्जत रस्त्यावरील हातनोली आदिवासीवाडी येथे एराफॉर वुमेन्स व अडॉर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने एक हात मदतीचा या अनुषंगाने हातणोली आदिवासी वाडी दत्तक घेण्यात आली असून होळीच्या पूर्वसंध्येला होळी सण साजरा करण्यासाठी ५९ कुटुंबांना गोड जेवणाचे साहित्य वाटप करण्यात आले.त्याचबरोबर लहान मुलांना खाऊ सोबत शैक्षणिक व चित्रकला करण्यासाठी चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले.
या आदिवासी वाडीत स्वच्छतेचे महत्व,महिला बचत गट स्थापन करून त्यांना स्वावलंबी बनविणे,मुलांसाठी शैक्षणिक कार्य,वृक्ष लागवड,दारूबंदी व नागरी सुविधांसाठी प्रयत्न करणार असून येथील मुलांना चित्रकार बनविण्यासाठी ही काम केले जाईल असे कला शिल्पकार रुपाली पाटोळे यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक राजेंद्र सरोज,शिरीष पारकर,माजी सरपंच प्रफुल्ल विचारे यांनी या कार्यात आर्थिक मदत करण्याचे कबूल करून रुपाली पाटोळे यांना त्यांच्या कामात सहकार्य करण्याचे जाहीर केले. यावेळी वयोवृद्ध स्त्रीया,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. सौ.पवार शाळा समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक मोहन दळवी आदीसह आदिवासी महिला,पुरुष व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment