Press "Enter" to skip to content

लोककलेच्या माध्यमातून योजनांची माहिती

महाड,रोहा व पोलादपूर तालुक्यात लोककला पथकांनी जागविला विकास कामांचा जागर

सिटी बेल • रायगड़ • धम्मशील सावंत •

ढोलकीवर पडणारी थाप आणि त्यापाठोपाठ ‘दोन वर्षे अभिमानाची… दोन वर्षे जनसेवेची… आपल्या महाराष्ट्र शासनाची’ हे शब्द कानी पडताच जमलेली गर्दी अन् कलापथकाच्या तरुण कलाकारांना मिळणारा प्रतिसाद असेच चित्र आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिसत होते. निमित्त होते…राज्य शासनाच्या विविध योजना पोचविण्यासाठी राबविलेल्या लोककलांच्या माध्यमातून जागर मोहिमेचे…

राज्य शासनच्या गेल्या दोन वर्षातील विविध विकासकामे, राबविलेल्या उपक्रम याबरोबरच जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ‘लोककलेच्या माध्यमातून विकासाचा जागर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी तीन लोककला पथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेस दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आज दिवसभरात महाडमधील शिवाजी चौक, महाड बस स्टँड, चवदार तळे परिसर, सुकट गल्ली, पोलादपूर बस स्टँड, पोलादपूर तहसील कार्यालय, रोहा तालुक्यातील रोहा बस स्थानक, सानेगाव, शेणवई व यशवंतखार या गावांमध्ये लोककलापथकांनी सादरीकरण केले.

या सादरीकरणाच्या वेळेस नागरिकांबरोबरच पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई, पत्रकार शैलेश पालकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, मान्यवर व्यक्तीही आवर्जून उपस्थित राहून कलापथकांच्या सादरीकरणास दाद देताना दिसत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.