वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या शिवांजली कार्यालयाच्या सभागृहात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रसायनी परिसरातील असंख्य महिलांनी विविध कार्यक्रमात भाग घेवून महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
सर्वंप्रथम माॅ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच ताई पवार आणि राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर महिलांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन सुमधुर अशा स्वागतगीताने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर सभापती वृशाली पाटील, सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच श्वेता कांबळे,राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे,माजी पंचायत समिती सभापती कांचन पारंगे, अॅड.अनघाताई कानिटकर, माजी सरपंच भाग्यश्री पवार आदीसह सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य उपस्थित होत्या.

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिला मान्यवरांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले.यावेळी ग्रामपंचायत सभागृहात महिलांनी पाककला साहित्य रेसिपीसह ठेवले होते. प्रशिक्षकांनी पाहणी केली असता सर्वं महिलांनी बनविलेली पाककला उत्कृष्ट असल्याचे सांगून तीन पाककला रेसिपींना प्रथम, व्दितीय व तृतीय रोख पारितोषिक देण्यात आले.
दरम्यान महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला.यावेळी परिसरातील शेकडो महिलांनी हळदीकुंकू कार्यक्रमात भाग घेतला.तर बकेट बाॅल, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात आदी महिलांचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी महिलादिन उत्साहात साजरा केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.








Be First to Comment