कुर्डुस मतदार संघात आमदार निधी कमी पडु देणार नाही : मानसीताई दळवी
सिटी बेल • नागोठणे • याकूब सय्यद •
जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघातील विकासकामांना निधी कमी पडु देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी दिली आहे. बिडवागळे येथील समाजमंदिराचे भूमीपुजन त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना मानसी दळवी म्हणाल्या, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी कुर्डुस मतदार संघात काही महिन्यात विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी आणला आहे. जिल्हा परिषदेमधूनही येथे विविध विकासकामे राबवली जात आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून येथे अनेक विकासकामे पुर्ण करण्यात आली आहेत. ही विकासगंगा अविरत सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव राहिलेल्या या मतदार संघातील विकासकामांना खीळ बसला होता. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज अशा अनेक समस्यांनी येथील नागरिकांना हैराण केले होते. अशा परिस्थितीत शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरु केली. याचमुळे आमदार महेंद्र दळवी यांना येथील मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करत मोठी आघाडी दिली होती. याचमुळे येथील मतदारांचा विश्वास शिवसेनेच्या बाजूने पुर्णपणे झुकला असल्याचे दिसून येत आहे. आ. महेंद्र दळवी आणि राजा केणी यांनी हा विश्वास ढळू दिला नाही. शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या मतदार संघात आणण्यात यश आले आहे. भविष्यातही ज्या योजना शेकापचे पुढारी करु शकले नाहीत, त्या पुर्ण करण्यासाठी निधी कमी पडु दिला जाणार नसल्याची ग्वाही मानसी दळवी यांनी यावेळी कुर्डुस मतदार संघातील मतदारांना दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ केणी, उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, विभागप्रमुख योगेश जुईकर, प्रफुल्ल म्हात्रे, अप्पा पिंगळे, सौ.छाया पिंगळे, तुषार शेरामकर, सूर्यकांत केणी, गिरीधर थले, उत्तमशेठ पाटील, प्रमोद पाटील, नंदकुमार म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment