Press "Enter" to skip to content

पुणे येथे वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धा

रायगडचा एम सी व्ही एस या संघावर 14 धावांनी थरारक विजय

सिटी बेल • पुणे •

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 7 मार्च पासून पुणे येथे सुरू झालेल्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या संघाने एम सी व्ही एस या संघावर 14 धावांनी रोमहर्षक व थरारक विजय मिळवुन, आपल्या सी गटातील पहिल्या सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले.

नाणेफेक जिंकून रायगड संघाने फलंदाजी स्वीकारली परंतु खेळपट्टीचा अंदाज चुकल्यामुळे त्यांचे सर्व गडी 18 षटकांमध्ये 52 धावांत बाद झाले. नंतर एम सी व्ही एस संघाने 44 षटकांत 136 धावा केल्या व पहिल्या डावात 84 धावांची महत्वपुर्ण आघाडी घेतली. रायगड संघनायक सागर सावंत यानी 5 बळी घेतले. त्याला 4 बळी घेऊन अभिषेक खातु याने तोलामोलाची साथ दिली.

रायगडच्या दुसऱ्या डावात 4 बाद 78 अशी धावसंख्या असतानाही खचुन न जाता रायगडने आपल्या दुसऱ्या योजनेनुसार धावपट्टीवर उभे रहात छोट्या छोट्या भागीदाऱ्या करत सर्व बाद 191 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. 7 व्या गड्याकरता सिद्धांत म्हात्रे व हार्दिक कुरंगळे यांनी 43 चेंडूत 26 धावा, 8 व्या गड्याकरता हार्दिक व अभिषेक खातू यांनी 138 चेंडूत 35 धावा तसेच 9 व्या गाड्या करता अभिषेक व संघनायक सागर सावंत यांनी केवळ 73 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. अभिषेक खातू नाबाद 32 व सागर सावंत यानी 29 धावा केल्या.

अशाप्रकारे एम सी व्ही एस संघाला चौथ्या डावात एकशे आठ धावांचे लक्ष दिले गेले. खेळपट्टीचे स्वरूप पाहता चौथ्या डावात 108 धावा करणे देखील आव्हानात्मकचं होते.

सागर सावंत याने आपल्या दुसऱ्या व संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये मध्ये 0 धावांवर पहिला बळी मिळवून सुरुवात छान करून दिली. दुसऱ्या बाजूने डावखुरा फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रे हा गोलंदाजी करत होता. त्याने पहिली सातही षटकं निर्धाव टाकून एक बळीही घेतला.

अशाप्रकारे त्यांच्यावर दडपण आणल्यानंतर त्यांचा डाव कोसळला व त्यांचे 6 फलंदाज 31 धावात गारद झाले. त्यानंतर सातव्या गाड्या करता 34 धावांची भागीदारी करत एम सी व्ही एस संघाने सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले. नंतर पुन्हा दोन गडी झटपट बाद झाल्याने त्यांच्या संघाचा धावफलक 9 बाद 72 असा झाला शेवटच्या जोडीने प्रतिकार करताना 21 धावांची भागीदारी केली परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले व शेवटचा गडी 93 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे रायगड संघाचा 14 धावांनी विजय झाला.

संपूर्ण सामन्यात सागर सावंत 7 बळी व 35 धावा अभिषेक खातू 8 बळी व 36 धावा सिद्धांत म्हात्रे 3 बळी व 17 धावा या तिघांच्याही अष्टपैलू खेळामुळे रायगड ने एम सी व्ही एस संघाविरुद्ध विजय साकारला.

अशा अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सभासद तसेच रायगडच्या सर्व क्रिकेटप्रेमींनी रायगड संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे व उर्वरीत पुढील सामन्यांकरीता संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेक बहुतुले, सरचिटणीस, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, रायगड.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.