Press "Enter" to skip to content

कोकण मराठी साहित्य परिषदेचा महिला दिन

जागतिक महिला दिन साजरा करताना ऑन डयुटी चोवीस तास असलेल्या भारतीय महिलांचा आदर्श घ्यावा – शैलेश पालकर

पोलादपूर महिला बालकल्याण विभागाने घेतले कोरोना बळींच्या विधवांच्या मदतीसाठीचे अर्ज

सिटी बेल • पोलादपूर • प्रतिनिधी •

पूर्वी तालुक्यात फारच तुरळक प्रमाणात महिलादिनाचे आयोजन होत असे. 2009 साली कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण नारीशक्ती सोहळयाचे आयोजन केल्यानंतर आता पोलादपूर शहरामध्ये 8 मार्च पासून 10 मार्चपर्यंत जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. भारताने आठ तासांच्या डयुटीसाठी संघर्ष करण्याच्या दिवसाचा आदर्श घेण्यापेक्षा ऑन डयुटी चोवीस तास असलेल्या भारतीय महिलांचा आदर्श जगाने घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी केले.

यावेळी व्यासपिठावर राजिप सदस्या सुमन कुंभार, निवासी नायब तहसिलदार शरदकुमार आडमुठे, सेवानिवृत्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे, आयुषचे डॉ.राजेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, सहायक गटशिक्षणाधिकारी वृक्षाली यादव, महिला व बालकल्याण प्रकल्पाधिकारी गोविंद धस, शिंदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार पालकर यांनी, कोरोना मृत पुरूषांची संख्या 42 तर महिलांची संख्या 12 अशी 54 जणांना मदत मिळण्याची सरकारी आकडेवारी दिसून आली तरी रूग्णालयात गेल्यावर आणि जाण्यापूर्वी मृत झालेल्यांच्या सर्वच आकडेवारीचा समावेश यामध्ये दिसून येत नाही. कोविड सुरक्षा कवचाच्या वल्गना होत असताना आताचे 50 हजार हे बुडत्याला काडीचा आधार असल्याचे सांगितले.

यावेळी पोलादपूर तालुक्यातील कोरोना बळींच्या नातेवाईकांना 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे अर्ज पोलादपूर महिला व बालकल्याण विभागाकडून भरून घेण्यात आले असून याखेरिज कोरोनामृतांच्या मुलांना अथवा मुलींना 18 वर्षे वयापर्यंत शिष्यवृत्ती देण्यासाठी विहित नमून्यातील अर्ज भरून प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती याप्रसंगी प्रकल्पाधिकारी गोविंद धस यांनी दिली.

यावेळी राजिप सदस्या सुमन कुंभार, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, सहायक गटशिक्षणाधिकारी वृक्षाली यादव, महिला व बालकल्याण प्रकल्पाधिकारी गोविंद धस तसेच महाडचे सुरक्षा अधिकारी यांनी विचार मांडले. सृष्टी सुकाळे या बालिकेने यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणादायी भाषण केले. यावेळी ज्येष्ठ अंगणवाडी सेविका केसरकर तसेच अन्य सेविकांनी अनुभव कथन केले.

याप्रसंगी डॉ.राजेश शिंदे आणि डॉ.गुलाबराव सोनावणे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसह अंगणवाडी सेविकांनी कोविड काळात केलेल्या कामांचा गौरव करून अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या स्वत:च्या जीवावर उदार होऊन केलेल्या सेवेला तोड नसल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.