Press "Enter" to skip to content

ज्ञानमंदिरात विज्ञान दिन उत्साहात साजरा

सिटी बेल • कळंबोली • प्रतिनिधी •

म.ए.सो ज्ञानमंदिर, कळंबोली प्रशालेत नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘वैज्ञानिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

त्यानिमित्ताने विद्यालयात विविध वैज्ञानिकांचे फोटो लावून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक कुतूहल निर्माण केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती महामात्र तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक
गोविंद कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये बालगायकांनी विज्ञान दिनावर आधारित पर्यावरण जोगवा गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान दडलेले आहे याचा शोध घेऊन त्यादृष्टीने विचार करावा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दरवर्षी विज्ञान दिनानिमित्त संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन सरांनी केले.
त्याचप्रमाणे विद्यालयात मराठी विज्ञान परिषद, चूनाभट्टी येथील विज्ञान प्रमुख चारूशीला जुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक खेळणी तयार करण्याची ‘खेळणी करु विज्ञान जाणू’ ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये इ. ६ वी ते ९ वी च्या एकूण ८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बालक सप्ताहानिमित्त विज्ञान गणित प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या काही प्रतिकृती व वैज्ञानिक खेळणी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासा पूर्ती करण्याच्या उद्देशाने TIFR, Mumbai या संस्थेला इ. ९ वी च्या १७ विद्यार्थ्यांनी भेट दिली.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, संजना बाईत, प्रियंका फडके यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर आणि शाळा समिती महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले‌.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.