Press "Enter" to skip to content

वार्दोली राजीप शाळेत महिला दिन

वार्दोलीच्या राजिप शाळेमध्ये मातृ पूजनाने जागतिक महिला दिन साजरा

सिटी बेल • पनवेल •

जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.ठीक ठिकाणी कर्तुत्ववान महिलांचे, नैपुण्य प्राप्त महिलांचे, वेगळ्या वाटा आत्मसात करणाऱ्या महिलांचे, विजीगिषु वृत्तीने संघर्ष करणाऱ्या महिलांचे सन्मान-सत्कार होत असतात. परंतु अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने वार्दोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिन साजरा केला.

पुरुष असो किंवा स्त्री हे दोघेही एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतात. अर्थातच आपली जन्मदात्री ही स्त्रीत्वाचा गाभा आहे. हा विचार मुलांच्या मनामध्ये ठसविला पाहिजे या उदात्त हेतूने वार्दोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मातृ पूजन आयोजित करून जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

सरपंच जानवी जितेंद्र बताले यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित महिलांचे कुंकवाचा करंडा, रुमाल, पुष्प देऊन आणि अत्तर लावून स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकाच्या द्वारे महिला दिनाची महती उपस्थितांना विशद केली. त्यानंतर अरुणा सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते गावातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण बिंदू ठरले ते म्हणजे मातृ पूजन. विद्यार्थी आपल्या आईसोबत शाळेत आले होते. आपल्या आईला पाटावर बसून तिचे चरण पाण्याने धुऊन, तिची आरती ओवाळून, तिच्या चरणी नतमस्तक होताना विद्यार्थी व त्यांच्या माता भावनाविवश झालेल्या पाहायला मिळाल्या.

कार्यक्रमाचेअंती उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आगळ्यावेगळ्या मातृपूजन सोहळ्याला सरपंच जानवी जितेंद्र बताले, केंद्रप्रमुख गीता गाताडे, ज्योती जगदीश पाटील, मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी उपशिक्षिका ज्योती भौपी यांच्यासह, विद्यार्थी, पालक, तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.