Press "Enter" to skip to content

वाढलेल्या वजनामुळे स्लीप ॲप्निया व झोपेच्या आजारांमध्ये झाली वाढ

प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने स्लीप ॲप्निया आजार आला चर्चेत : वाचा काय आहे हा आजार

सिटी बेल • आरोग्य प्रतिनिधी •

सुदृढ आरोग्य आणि उत्तर काम करण्यासाठी शरीराला पुरेशी झोप आवश्यक असते. शहरांमध्ये बदललेल्या जीवनपद्धतीमुळे अपुरी झोप ही भेडसावणारी समस्या असून  पुरेशी झोप न मिळण्याचे अजून एक ठळक कारण म्हणजे स्लीप ॲप्निया हा आजार आहे.  

घडाळ्यातल्या काट्यावर फिरणाऱ्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये स्लीप ॲप्निया आजाराचे रुग्ण वाढत आहेत. कालच प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले असून ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.

ॲप्निया शब्दाचा अर्थ आहे श्वास लागणं किंवा श्वासावरोध. आणि झोपेत जीभ आणि जीभेमागचे काही स्नायू शिथील झाल्यामुळे अशी स्थिती तयार होत असेल तर त्याला स्लीप ॲप्निया असं म्हणतात. स्लीप ॲप्निया हा आजार गेल्या दोन वर्षांत वाढला असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातून झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे फुफ्फुसरोग तज्ञ डॉ. पार्थिव शहा म्हणाले,” कोरोना महामारीनंतर अनेकांना याचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. कोरोना महामारीच्या काळात घरी अडकल्यामुळे अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा  लागत असून स्लीप ॲप्नियाचे मुख्य कारण हे लठ्ठपणा आहे. नैसर्गिकरित्या वरील भागातील लहान श्वसननलिका मार्ग, मोठ्या आकाराची जीभ, टॉन्सिल्स, पडजीभ हे घटक कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे मागील बाजूस गेलेली हनुवटी, मोठी मान यामुळेही स्लीप ॲप्निया होण्याची शक्यता असते. वैद्यकीय अभ्यासानुसार स्लीप ॲप्नियाचा  आजार अनुवंशिक असल्याचेही आढळून आले आहे.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे झोप खराब होते , हा आजार असलेल्या व्यक्तीला अनेक वेळा रात्री उठावे लागते. यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. जर एखाद्याला अनेक महिने सतत स्लीप एपनिया होत असेल. त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. याचा त्रास असलेल्या व्यक्तीला नैराश्य, तणाव, अस्वस्थता, चिंता, कोणत्याही कामात मन न लागणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. शारीरिक समस्या सोबत मानसिक समस्या वाढतात. झोप न मिळाल्यामुळे अनेकवेळा उच्च रक्तदाब तसेच मधुमेह वाढण्याच्या समस्या होतात व या याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या हृदयावर होतो. स्लीप अ‍ॅप्नीया हा आजार जेवढा जास्त गंभीर असेल तेवढा हृदयरोग, स्ट्रोक, डायबिटीस आणि इतर आजारांचा धोका जास्त असतो.”   

झोप कमी किंवा जास्त करण्यासाठी किंवा त्याची वेळ बदलण्यासाठी कुठलीही गोळी, आयुर्वेदिक काढा किंवा अंमली पदार्थाचा वापर करू नये. स्लीप ॲप्निया या आजाराचे निदान करण्यासाठी पॉली सोनोग्राफी, ईईजी टेस्ट, ईकेजी टेस्ट आणि ऑक्सीजन टेस्ट व इतर वैद्यकीय  चाचण्या करून घेणे जरुरीचे आहे. अनेक नागरिकांना स्लीप ॲप्निया हा आजार आपल्याला आहे याची जाणीव नसते व पहिली पाच ते सहा वर्षे घरगुती उपाय करण्यात वेळ घालवतात व या काळात शरीरात इतर आजार वाढतात अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे फुफ्फुसरोगतज्ञ डॉ. पार्थिव शहा यांनी दिली. स्लीप ॲप्निया या आजारावर आज अनेक आधुनिक उपचार थेरपी तसेच शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.