Press "Enter" to skip to content

उपमहापौर सीताताई पाटील यांची मागणी

माता रमाई, जय सेवालाल झोपडपट्टी व आदिवासी वाडी या झोपडपट्ट्यांचे नव्याने पुनर्वसन करावे

सिटी बेल • पनवेल • साहिल रेळेकर •
     

पनवेल महानगरपालिकेमार्फत गृहसंकुलनाच्या कामाला चालना मिळाली आहे. परंतु खांदा कॉलनी मधील काही झोपडपट्टया अविकसितच राहिल्या आहेत. खांदा कॉलनी, सेक्टर १२ मधील माता रमाई झोपडपट्टी, जय सेवालाल झोपडपट्टी व आदिवासी वाडी याठिकाणी पिढ्यानपिढ्या नागरिक राहत आहेत. याठिकाणी असणाऱ्या माता रमाई, जय सेवालाल झोपडपट्टी व आदिवासी वाडी या झोपडपट्ट्यांचे नव्याने पुनर्वसन करावे, अशी मागणी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांनी केली आहे.         

येथील नागरिक वर्षानुवर्ष याठिकाणी एकत्र वास्तव्य करीत आहेत. त्यांना निश्चित अशी जागा नसल्यामुळे तेथील नागरिकांना सार्वजनिक शौचालयांचे वापर करावे लागते. नाले, गटारे उघड्यावर असल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम जलदगतीने सुरु झाले आहे. परंतु येथील झोपडपट्टीवासी आता त्यांचा परिसरही विकसित व्हावा यासाठी मागणी करीत आहेत. तसेच पनवेल शहराचा विकास व्हावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्नशील आहे.

या पार्श्वभूमीवर माता रमाई, जय सेवालाल झोपडपट्टी व आदिवासी वाडी या झोपडपट्ट्यांचे लवकरात लवकर नव्याने पुनर्वसन सुरु करुन येथील नागरिकांना हक्काची जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी उपमहापौर सीताताई पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.