भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात – हाजी जमाल सिद्दीकी
सिटी बेल | पनवेल |
कार्यकर्त्यांनी आपल्या समोर ध्येय ठेवले पाहिजे तसेच त्यांनी स्वप्नदेखील पाहिली पाहिजेत कारण भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांनी केले. ते पनवेल येथे आयोजित कोकण विभागीय आढावा बैठकी मध्ये बोलत होते. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी या शानदार आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
आपल्या भाषणात हाजी जमाल सिद्दिकी पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला एका सक्षम राजकीय पक्षाची आवश्यकता आहे. आणि तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांनी अल्पसंख्यांक समाज हा त्यांची व्होट बँक असल्याचे गृहीत धरले आहे. परंतु सबका साथ सबका विकास! असे म्हणत जे देशाचे नेतृत्व सक्षमपणे करत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाने त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. ज्यांनी सर्वप्रथम देश मग पक्ष आणि नंतर मी असे सूत्र आपल्याला दिले आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सक्षम आणि पक्ष विचाराला समर्पित झालेला कार्यकर्ताच पुढे जाऊ शकतो, येथे वशिलेबाजी वर पुढे जाणे जवळ जवळ अशक्य आहे. मी पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी जास्तीत जास्त प्रवास करून बूथ, मंडल, जिल्हा पिंजून काढले पाहिजेत. हे करत असताना आपले अर्थार्जन आपल्यालाच करायचे आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा हा उसुल आहे की ना मै खाऊंगा ना किसी को खाने दुंगा. त्यामुळे आपला व्यवसाय, कारभार,नोकऱ्या हे सारे सांभाळून आपल्याला संघटन मजबूत करायचे आहे. संघटन हे समूहाचे काम आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोक जोडून सगळ्यांनी मिळून ते केल्यास ते अधिक प्रभावीपणे होते.
या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दिकी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी इजाज देशमुख, पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतिक खान, महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष महबूब खैरवा, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पठाण, कार्यकारिणी सदस्य अनिस अन्सारी, प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक मुनोवर पटेल, पनवेल शहर उपाध्यक्ष अमरीश मोकल, तबस्सूम बैरागदार, इफ्तेखार आतार, जसिन ब्यास,रियान तुंगेकर,निसार सय्यद,साबीर शेख आदी मान्यवर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रसिद्ध निवेदिका सुमेधा लिम्हण यांनी सुमधुर आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी पदाधिकारी यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे रसग्रहण केले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या अप्रतिम नियोजनामुळे कार्यक्रमाने एक बहारदार उंची गाठली होती. उपस्थित सर्वच मान्यवरांनी सय्यद अकबर यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
Be First to Comment