Press "Enter" to skip to content

मुरूड तालुका पत्रकार संघाची मागणी

शोकांतिका… जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिनाला अद्यापही शासकीय सलामी नाही

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

1947 साली भारत स्वतंत्र झाला तरी देखील जंजीरा संस्थान अधिपती असणारे सिद्धी हे भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. पण सैनिक आणि जनतेने उठाव केल्याने रक्तरंजित क्रांती न होता संस्थान भारतात विलीन झाले.आणि तो दिवस होता 31 जानेवारी 1948.स्वातंत्र्य पूर्व काळात संपूर्ण भारतातील 572 संस्थाने होती.

त्यातील काही संस्थानात रक्तरंजित क्रांती अथवा हिंसक वळण न लागता भारतात विलीन झालेले जंजिरा संस्थान हे एकमेव संस्थान असल्याने गेल्या काही वर्षांपासून मुरूड पत्रकार संघ आणि रायगड प्रेस क्लब यांच्या मार्फत मुरूड शहरातील आझाद चौक येथे भारतीय ध्वज फडकवून सलामी दिली जात आहे.

मात्र मराठवाड्याप्रमाणे या संस्थांमध्ये दरवर्षी31 जानेवारी हा दिन शासकीय स्तरांवर साजरा करण्यात यावा यासाठी मुरूड तालुका पत्रकार संघ यांनी तहसीलदार पासून जिल्हाधिकारी , पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे.मात्र अद्यापही या दिनाला शासकीय स्तरावरून 31 जानेवारी रोजी शासकीय सलामी मिळत नाही हीच मोठी शोकांतिका आहे.आजपर्यंत रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनीसुद्धा याबाबत शासनाकडे नक्कीच पाठपुरावा करीत आहे का? अशी शंका आता तालुकावासीयांमध्ये होत आहे.की फक्त राजकारणी मुरुडकरांना फक्त आश्वाशीत ठेवत आहे.

जंजिरा संस्थान हे मुरूड,म्हसळा,आणि श्रीवर्धन मिळून जंजिरा संस्थान होते.या संस्थानची राजधानी मुरूड येथे होती. जंजिऱ्याच्या सिद्धीची राजवट संपुष्टात यावी म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढयाप्रमाणे जंजिरा संस्थानीतील जनतेने देखील जोमाने मुक्ती लढा सुरू केला होता.जंजीरा नबाब जरी प्रजाहितदक्ष व जनतेच्या सोयीसुविधांसाठी जागरूक असले तरी कुठेतरी आपणाला स्वातंत्र्य मिळून भारतात विलीन व्हावे असे जनतेला वाटत होते. यासाठी संस्थानातील अभ्यासू सैनिकांनी जंजिरा संस्थान मुक्तीची चळवळ आरंभ केला होती.

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत देश १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला मात्र त्यापूर्वी येथील क्रांतिवीरांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणपणाने संघर्ष करावा लागला होता. ब्रिटिशांची देशावरील सत्ता उलथवून लावण्यासाठी सारेच प्राणपणाने लढले. हा संग्राम यशस्वी झाला आणि १५ आॅगस्टला भारताचा तिरंगा डौलाने फडकला, मात्र विविध संस्थानच्या संस्थानिकांनी आपल्या ताब्यातील संस्थाने खालसा करण्यास तयारी दाखविली नाही. जंजिऱ्याचे नबाब सिध्दी महमद खान यांनी १४ आॅगस्ट १९४७ रोजी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली असली तरी जंजिरा संस्थान ३१ जाने. १९४८ रोजी विलीन केले.

मुरुडसह म्हसळा आणि श्रीवर्धन हे स्वतंत्र झाले. त्यामुळे ३१ जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिशांनी भारत देशावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केले. परचक्रातून भारतमातेला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी ब्रिटिशांविरुध्द प्राणपणाने झुंज दिली. प्राणांचे बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले. इंग्रजांना दे माय धरणी ठाय करुन सोडले.

ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं. सारी संस्थानं भारतात विलिन झाली. अपवाद होता तो,जुनागड, हैदराबाद, जम्मू-काश्मीर आणि मुरूड जंजिरा संस्थानचा.जुनागड,हैदराबाद आणि जंजिरा संस्थानात राजे मुस्लिम होते.प्रजा हिंदू होती.जम्मू-काश्मीरमध्ये मात्र राजा हिंदु आणि बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती. जुनागड, हैदराबादच्या नबाबांना भिती अशी वाटत होती की,स्वतंत्र भारतात आपण विलिन झालो तर आपल्याला सन्मानाची वागणूक मिळणार नाही.त्यामुळं ते पाकिस्तानशी संधान बांधून होते.आपण पाकिस्तानात विलिन व्हावे असा त्यांचा प्रयत्न होता.जंजिऱ्याचा नबाबही याच मताचा.त्यालाही पाकिस्तानात विलिन व्हावं असंच वाटत होतं.त्यासाठी त्याचीही खटाटोप सुरू होता.

हैदराबादला पाकिस्तानात विलिन होण्याचं स्वातंत्र्य देणं जेवढं धोक्याचं होतं तेवढंच जंजिऱ्याच्या नाबाबालाही असा अधिकार देणं एकसघ हिंदुस्थानच्या कल्पनेला मारक ठरणारं होतं.हे स्वातंत्र्यप्रेमी जनता आणि भारत सरकारच्याही लक्षात आलं होतं.मात्र भारत सरकारचा प्रयत्न असा होता की,हे सामिलीकरण कोणताही रक्तपात न होता अन्य संस्थानासारखं सुरळीत व्हावं.त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते.

तथापि या प्रयत्नांना हैदराबाद,जुनागड किंवा जंजिऱ्याचा नबाब दाद देत नव्हता. अखेरिस काही ठोस भूमिका घेतल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही याची जाणीव तत्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना झाली. त्यांनी हैदराबाद संस्थानावर लष्करी कारवाई करण्याचा नि र्णय मनोमन धेतला होता.तो सप्टेंबर 1948मध्ये प्रत्यक्षात आणला..हैदराबाद संस्थानावर पोलिस ऍक्शन झाल्यानंतर निजाम केवळ चारच दिवसात शरण आला.हैदराबाद संस्थान 17 सप्टेबरला 1948 ला स्वतंत्र झालं.म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठवाडा तेरा महिन्यांनी स्वतंत्र झाला. दृ स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक दिवस संघर्ष करावा लागला.हैदराबाद मुक्तीचा हा सारा इतिहास अंगावर रोमांच उभा करणारा आहे. जनआंदोलनाला नि जाम दाद देत नाही म्हटल्यावर हैदराबादेत लष्करी कारवाई करावी लागली पण तशी वेळ जंजिऱ्यात आली नाही.

स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या दबावापुढं जंजिऱ्याच्या नबाबाला दबाव लागलं. अखेर कोणाचंही रक्त न सांडताच जंजिरा संस्थान भारतात विलीन झालं.तो दिवस होता 31 जानेवारी 1948 चा.म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल साडेपाच महिन्यांनी मुरूड जंजिरा संस्थानातील म्हणजे आजच्या मुरूड,श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील जनता स्नतंत्र झाली.दुर्दैवानं जंजिरा संस्थान 31 जानेवारी रोजी संपुष्टात आलं आणि त्याच्या एक दिवस अगोदरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली .

मुरूडचं स्वातंत्र्य राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मिळाल्यामुळं असेल किंवा किंवा जंजिरा संस्थान अवख्या तीन तालुक्यापुरतंच छोटं असल्यानं असेल पण जंजिरा मुक्ती लढ्याची इतिहासानं पाहिजे तेवढी नोद घेतली नाही.जंजिरा मुक्तीचा देदिप्यमान लढ्याची माहिती रायगडमधील जनतेला किंवा विध्यार्थ्यानाही माहिती नाही.रक्तपात न होता मिळालेल्या या स्वातंत्र्याची तेव्हा आणि आजही सरकारी पातळीवर उपेक्षाच झाली.त्याची खंत या लढ्यातल्या आज हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना नक्कीच आहे.

मानधन देऊ नका,आम्हाला सवलती देऊ नको पण किमान आम्ही स्वातंत्र्य सैनिक होतो हे तरी सरकारी पातळीवर मान्य करावे असा जंजिरा मुक्ती लढ्यातील आज हयात असलेल्या काही स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचा आहे आणि होता. .तो पूर्ण करायला काहीच हरकत नाही.सरकारला ते महत्वाचं वाटत नाही.देशासाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्यांची मोठी उपेक्षा देशात झाली आहे तेच भोग जंजिरा लढ्यातील सैनिकांच्याही वाट्याला आले आहेत.

मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेबंर रोजी मराठवाड्यात तो दिवस उत्साहात साजरा केला जातो.सार्वजिक सुटी दिली जाते. मुख्यमंत्री औरंगाबादला जातात.त्यांच्या हस्ते झेंडावंदन केलं जातं.त्याच धर्तीवर जंजिरा संस्थानातील तीन तालुक्यात किंवा रायगड जिल्हयात जंजिरा मुक्ती दिन शासकीय पातळीवर साजरा व्हावा,शाळांमधून झेंडावंदन केलं जावं,या लढ्याची माहिती देणारे धडे अभ्यासक्रमात असावेत ही मुरूड तालुका पत्रकार संघासाहित रायगडातील पत्रकारांची आणि जनतेची मागणीही आहे.ती पूर्ण होत नाही. त्यासाठी सरकारी पातळीवर बरेच प्रयत्न पत्रकारांनी केले पण ते व्यर्थ ठरले.या लढ्याची अक्षम्य उपेक्षा झाल्यानं जंजिरा मुक्तीचा लढा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही माहित नाही ही खरी शोकांतिका आहे..

अमूलकुमार जैन
अध्यक्ष, मुरूड तालुका पत्रकार संघ

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.