Press "Enter" to skip to content

रोह्यात भव्य मराठा भवन

७५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन साडेतीन हजार स्क्वेअर फूटाचे भव्य दिव्य मराठा भवन राहणार उभे

आगामी काळात मराठा समाजाने कामे सुचविल्यास आपण ती करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू – खा.सुनिल तटकरे

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |

रोहा नगरपालिकेच्या सुशोभन व विकास कामांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. रोह्यात मराठा भवनासाठी शासनाकडे पालकमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुमारे ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन साडेतीन हजार स्क्वेअर फूटाचे भव्य दिव्य मराठा भवन याठिकाणी उभे राहणार आहे.आगामी काळात मराठा समाजाने विविध कामे सुचविल्यास आपण ती करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू असे रोखठोक प्रतिपादन रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोह्यात केले.
   

रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून रोहा शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रामुख्याने भाटे सार्वजनिक वाचनालय पासून आसिफ कर्जीकर यांच्या घरापर्यंत चा रस्ता विकसित,दामजी मेघजी मिल पासून वरचा मोहल्ला रस्ता विकसित,श्री धावीर मंदिर ते सुंदर नगर मिल्लत नगर पर्यंतचा रस्ता विकसित करणे.यांसह मराठा समाज भवनाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते व्यासपीठावर बोलत होते.विशेष म्हणजे मराठा समाजाने केलेल्या मागणीनुसार  पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माणाधीन मराठा समाज भवनाचे भूमिपूजन म्हाडा कॉलनी परिसरात मोठ्या दिमाखात पार पडले.

यावेळी वुमन्स क्लब हाऊस म्हाडा वसाहत येथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,प्रदीप देशमुख,ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी,महेंद्र गुजर,मयुर दिवेकर,सारिका पायगुडे,राजेंद्र जैन,समीर सकपाल,महादेव साळवी,महेश कोल्हटकर ,चंद्रकांत पार्टे, अमित उकडे, अनिकेत पाटील मुख्याधिकारी दयानंद गोरे,नगरपालिकेतील सर्व नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   

व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करताना खा सुनील तटकरे पुढे म्हणाले की,आज भूमिपूजन करण्यात आलेले रोह्यातील मराठा समाज भवन मराठा तरुणांना मार्गदर्शक ठरेल तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी हे भवन उपयुक्त ठरेल असेही ते शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले.तर समाजासाठी भव्यदिव्य वास्तुसाठी मंजूर केलेल्या भवनाबाबत मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष अमित उकडे यांनी खा. सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.