शेकाप चे पदाधिकारी कादिर भाई कच्छी यांचे अकाली निधन
सिटी बेल | पनवेल |
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष कादिर भाई कच्छी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने आप्तेष्ट, कार्यकर्तेआणि त्यांच्या हितचिंतक वर्गात अत्यंत दुःखाचे वातावरण आहे. शुक्रवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
धाडसी स्वभावाच्या कादिर भाई यांची एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख होती. पक्षाने टाकलेली प्रत्येक जबाबदारी हिरीरीने पार पाडण्याचा त्यांचा हातखंडा होता. पक्ष विचारधारेशी एकनिष्ठ राहत संघटन मजबूत करण्यामध्ये देखील त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. सदा हसतमुख राहणे आणि नम्रपणे बोलण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे पक्षात तसेच पक्षाबाहेर देखील त्यांनी अनेक चाहते जोडले होते. शेतकरी कामगार पक्षाने पुकारलेल्या आंदोलनांमध्ये मात्र ते आक्रमकपणे सहभागी होत असत. त्यांच्या अकाली जाण्याने पक्षात एक अनामिक पोकळी निर्माण झाली आहे.
निधनापूर्वीच्या आठवड्यात ते पनवेल मधील आधार हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे येथे उपचाराकरता नेण्यात आले होते तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री आमदार बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका जिल्हा शेकापचे चिटणीस, नगरसेवक गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कादिर कच्छी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. उत्तररात्री पनवेल येथे दफनभूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर दफनविधी पार पडले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते कादिर भाई कच्छी यांचे दुखःद निधन झालेलं आहे. एक मैत्रिला जागणारा कार्यकर्ता म्हणून कादिर भाईची ओळख होती.गोरगरिबांना मदत करणारा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कुठल्याही सोहळ्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमांमध्ये कुठल्याही क्षणी अतिशय निष्ठेने उतरणारा एक सहकारी कादिर भाई यांच्या रूपाने आज आम्ही गमावलेला आहे.मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कादिर भाईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जाण्यानं अतिशय जवळचा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा सहकारी मी व्यक्तिशः गमावलेला आहे आहे. या गोष्टीचे निश्चित पणाने दुःख मनामध्ये आहे.कादिर भाईंना विनम्र अभिवादन.!!
– श्री.बाळाराम पाटील
आमदार, कोकण शिक्षक मतदारसंघ.
शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ च्या टीम मधील माझा एक सच्चा साथीदार हरपल्याचे खूप दुःख आहे. मागासवर्गीय लोकांसाठी किंबहुना त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने कादिर माझ्याकडे येत असे. पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत हिरिरीने पार पाडणारा असा मनमिळावू स्वभावाचा साथीदार अकाली गेल्यामुळे दुःख होते. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिली तर नगरसेवक म्हणून लढण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली होती. त्यादृष्टीने त्यांने काम सुद्धा सुरू केलं होत. आज त्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही याची फार फार खंत वाटते. कादिर भाईच्या जाण्याने पक्षामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
काशिनाथ पाटील
अध्यक्ष
शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ.
Be First to Comment