Press "Enter" to skip to content

पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा

नगरपंचायत पोलादपूर येथे काँग्रेसने भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे तर भाजपने काँग्रेसचे उमेदवार पाडल्याने शिवसेनेचा आश्चर्यकारक विजय : शिवसेना 10 – काँग्रेस – 6 तर भाजप 1

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

नगरपंचायत पोलादपूरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अफाट मेहनतीनंतर शिवसेनेविरोधात केलेल्या लढतीत काँग्रेसने भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे तर भाजपने काँग्रेसचे उमेदवार पाडल्याने शिवसेनेचा आश्चर्यकारक विजय झाला असून भारतीय जनता पार्टीने अनेक ठिकाणी चिखल करीत एका प्रभागात कमळ फुलवून आणल्याचे चित्र दिसून आले आहे. 17 प्रभागांपैकी शिवसेनेला 10 तर काँग्रेस पक्षाला 6 उमेदवार निवडून आणता आले आहेत तर भाजपच्या एक उमेदवार विजयी झाल्या आहेत.

प्रभाग 1 मध्ये शिवसेनेने बिनविरोध विजयासाठी माजी नगराध्यक्षा सुनीता पार्टे यांना अडीच वर्षांची संधी दिली असताना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आलेल्या मीनल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याचा परिणाम, शिवसेनेच्या प्रभागातून काँग्रेस पक्षाला एकही मत न देण्यात झाला असून शिवसेनेच्या सुनीता पार्टे यांना 81 मते तर काँग्रेसच्या मीनल जगताप यांना 0 मते मिळाली आहेत.

प्रभाग 2 मध्ये काँग्रेसच्या कल्पेश सुखलाल मोहिते यांना 148 मते मिळाली. भाजपाचे संभाजी माने यांना 17 मते मिळाली आणि शिवसेनेचे मनोज प्रजापती यांना 155 मते मिळून 7 मतांनी विजय झाला.

प्रभाग 3 मध्ये काँग्रेसचे निखिल कापडेकर यांना 84 मते मिळाली त्यांना भाजपाच्या विशाखा आंबेतकर यांनी 50 मते मिळविली तर शिवसेनेचे रोहित सावंत 47 मते मिळाल्याने निखिल कापडेकर यांना 34 मताधिक्याने विजय प्राप्त झाला.

प्रभाग 4 मध्ये शिवसेनेच्या शिल्पा दरेकर यांना 146 मते मिळाली येथे काँग्रेसच्या प्रतिक्षा शिंदे यांना 123 मते मिळाली तर भाजपाच्या शीला बुटाला यांना 39 आणि अपक्ष प्रणाली भुवड यांना 13 मते मिळाली. शिल्पा दरेकर यांना 23 मतांनी निकटच्या प्रतिसर््पध्याविरूध्द विजय मिळाला.

प्रभाग 5 मध्ये शिवसेनेच्या स्नेहा मेहता यांना 95 मते मिळाली. काँग्रेसच्या अपर्णा कदम यांना 66 मते मिळाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत असल्याने राष्ट्रवादीच्या माधुरी विचारे यांना 33 मते मिळाली. याठिकाणी विजयी झालेल्या शिवसेनेच्या स्नेहा मेहता यांना 29 मताधिक्य मिळाले आहे.

प्रभाग 6 मध्ये शिवसेनेच्या अस्मिता पवार यांना 99 मते मिळाली. भाजपाच्या रश्मी राजा दिक्षित यांना 70 मते मिळाली तर काँग्रेसच्या समिघा महाडीक यांना 18 मते मिळाली. अस्मिता पवार यांनी निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा 19 मते अधिक मिळवून विजय प्राप्त केला.

प्रभाग 7 मध्ये काँग्रेसच्या आशा गायकवाड यांना 172 मते मिळाली. शिवसेनेच्या सुषमा पवार यांना 102 मते मिळाली. भाजपच्या हर्षदा बोरकर यांना 7 मते मिळाली. आशा गायकवाड यांनी निकटच्या प्रतिस्पर्धीपेक्षा 70 मते अधिक मिळविली.

प्रभाग 8 मध्ये शिवसेनेच्या सोनाली गायकवाड यांना 130 मते मिळाली अनिता जांभळेकर यांना 117 मते मिळाली तर भाजपच्या रचना धुमाळ यांना 55 मते मिळाली. या लढतीत शिवसेनेच्या सोनाली गायकवाड यांनी निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 13 मते अधिक मिळविली आहेत.

प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या तेजश्री गरूड यांना 122 मते मिळाली तर भाजपच्या मंजू मोरे यांना 60 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या तेजश्री गरूड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा थेट लढतीमध्ये 62 मतांनी पराभव केला.

पोलादपूर शहरामध्ये सर्वात चर्चेची ठरलेल्या प्रभाग 10 मधील लढतीत शिवसेनेचे प्रसाद इंगवले यांनी 123 मते मिळवून काँग्रेसच्या विरोधीपक्षनेत्या शुभांगी चव्हाण 110 मते यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव केला. याठिकाणी भाजपचे प्रतीक सुर्वे यांना 13 मते मिळाली. याठिकाणी शिवसेनेचे प्रसाद इंगवले यांना निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 13 मते अधिक मिळाली.

प्रभाग 11 मध्ये काँग्रेस उमेदवार स्वप्नील भुवड यांनी अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार सारिका पालकर यांचा पराभव केला. स्वप्नील भुवड यांना 147 मते तर सारिका पालकर यांना 95 मते मिळाली. भुवड यांना 52 मतांची आघाडी मिळाली.

प्रभाग 12 मध्ये काँग्रेस उमेदवार श्रावणी शहा यांना 77 तर शिवसेनेच्या मृगया शहा यांना 69 मते मिळाली. मनसेच्या प्रज्ञा सुर्वे यांना 2 मते मिळाली. काँग्रेसच्या श्रावणी शहा यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 8 मते अधिक मिळाली.

प्रभाग 13 मध्ये शिवसेनेचे सिध्देश शेठ यांना 97 मते मिळाली तर भाजपचे प्रसन्ना पालांडे यांना 91 मते मिळाली. याठिकाणी कॉग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युवराज पवार यांना 17 मते मिळाली. शिवसेनेचे सिध्देश शेठ यांना निकटच्या प्रतिस्पर्धीपेक्षा 8 मतांची आघाडी मिळाली.

प्रभाग 14 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अंकिता जांभळेकर यांनी 55 मते मिळवली. शिवसेनेच्या प्राची सुतार यांना 49 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिक्षा भूतकर यांना 20 मते मिळाली. याठिकाणी भाजपच्या अंकिता जांभळेकर यांना निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा 6 मते अधिक मिळाली.

प्रभाग 15 मध्ये शिवसेनेचे विनायक दिक्षित यांना 134 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अनिलकुमार भोसले यांना 84 मते मिळाली. भाजपचे एकनाथ कासुर्डे यांना 18 मते मिळाली. याठिकाणी शिवसेनेचे विनायक दिक्षित यांना निकटचे प्रतिस्पर्धीपेक्षा 50 मते अधिक मिळाली आहेत.

प्रभाग 16 मध्ये शिवसेनेचे नागेश पवार यांना 68 मते मिळाली. राष्ट्रवादीचे अजित खेडेकर यांना 38 मते मिळाली. याठिकाणी भाजपचे नितीन बोरकर यांना 0 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे नागेश पवार यांना निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 30 मते अधिक मिळून ते विजयी झाले आहेत.

प्रभाग 17 या अतिशय प्रतिष्ठेच्या लढतीत काँग्रेसचे माजी सभापती दिलीप भागवत यांना 80 मते मिळाली तर शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश पवार यांना 71 मते मिळाली. याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दर्पण दरेकर यांना 46 मते मिळाली आहेत.

विरोधी मतांचे विभाजन काँग्रेस व भाजपमध्ये झाल्याचा प्रचंड लाभ शिवसेनेला झालेला मतदानाची आकडेवारी स्पष्ट करीत आहे. शिवसेनेकडून आ.भरत गोगावले, युवासेना अधिकारी विकास गोगावले, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृउबा संचालक लक्ष्मण मोरे, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी विजयी उमेदवारांचे कौतुक करण्यास उपस्थित होते. काँग्रेसकडून महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप, प्रदेश सचिव स्नेहलदिदी जगताप कामत, महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव तसेच पोलादपूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदार व पालकमंत्री आघाडीच्या प्रचारामध्ये सक्रीय होऊनही याठिकाणी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चंचूप्रवेश झाला नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.