Press "Enter" to skip to content

देव माणूस हरपला !

डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक : डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन

सिटी बेल | पनवेल |

डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे गुरूवार दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. कोरोना निर्बंध असल्याने अगदी मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत उत्तर रात्री अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचा देव माणूस म्हणून उल्लेख करणे कदाचित तितके पुरेसे होणार नाही. मनुष्याला देव माणूस बनण्याचे कसब शिकविणारे देव माणूस ! असाच त्यांचा उल्लेख करावयास हवा.कारण त्यांच्याच संस्कारात घडलेले डॉक्टर गिरीश गुणे आज जनसेवेचा वसा तितक्याच नेटाने सांभाळत आहेत.रुग्णसेवा हा व्यवसाय नसून ती मनुष्य सेवा आहे हा विचार डॉ. गोविंद गुणे यांनी रुजविला.तोच संस्कार त्यांनी चिरंजीव डॉ गिरीश गुणे यांना देखील दिला. म्हणूनच डॉ.गोविंद गुणे आणि डॉ.गिरीश गुणे यांना आज गरीब रुग्णांचे देव म्हणून संबोधले जाते.

डॉ. गोविंद गुणे यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३३ रोजी पंढरपूर येथे झाला. मुंबई मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत त्यांनी DASF पदवी प्राप्त केली. त्यानंतर तब्बल 56 वर्षे त्यांनी रुग्ण सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. पनवेलच्या टपाल नाका येथे शनी मंदिरासमोर त्यांचे स्वतःचे क्लिनिक होते. तब्बल 35 वर्षे त्यांनी या क्लिनिकच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांची सेवा केली. अत्यल्प शुल्क ते सुद्धा असल्यास द्यावे,अशा वृत्तीने ते जनसेवा करायचे.

रुग्णसेवेचे सोबतच रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली. ज्या समाजात आपण अर्थार्जन करतो त्या समाजाचे आपण ऋण फेडले पाहिजे या भूमिकेतून रोटरी क्लब च्या विविध उपक्रमांना ते भरभरून देणग्या देत असत. रायगड जिल्ह्यातील पहिले पी एच एफ डोनर (Paul Harris fello recognition) म्हणून त्यांनी सन्मान पटकाविला होता. पोलिओ निर्मूलनाच्या अभियानात या देणग्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असत. त्यानंतर डॉक्टर गोविंद गुणे यांनी अनेकदा देणग्या देत पी एच एफ डोनर म्हणून बहुमान पटकावला. २०१७ साली पनवेलच्या वि.खं. विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यात,ज्या शाळेने आपल्याला विद्या देऊन डॉक्टर घडविले,त्या आपल्या शाळेचे आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून डॉक्टर गोविंद गुणे आणि डॉक्टर गिरीश गुणे यांनी तब्बल पंचवीस लाख रुपयांची देणगी दिली.

डॉक्टर गोविंद गुणे हे रायगड मेडिकल असोसिएशनचे आजीव सभासद होते. आज दिमाखात उभ्या असलेल्या आणि रुग्ण सेवेमध्ये अखंडपणे वाहून घेतलेल्या गुणे हॉस्पिटलचे ते संस्थापक होय.सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर डॉक्टर गुणे यांचा टुमदार बंगला आहे. कालांतराने त्याचा राहण्यासाठी वापर होत नसल्याने तो देखील समाजाच्या उपयोगी पडावा या हेतूने तो कधी पोलीस आयुक्त, कधी गरजवंत शाळा तर कधी रोटरीच्या उपक्रमांकरता डॉक्टर गुणे यांनी खुला करून दिला.

डॉ. गोविंद गुणे यांच्या पत्नी सौ गिता लॅब टेक्निशियन होत्या. सुरुवातीला त्या पनवेल रुग्णालय येथे लॅब टेक्निशियन म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतःची लॅब सुरू केली होती. एक वर्षापूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.डॉ.गोविंद गुणे यांच्या ८१ व्या वर्षी त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला होता. डॉक्टर गोविंद यांना आकाशवाणीवरील संगीत ऐकण्यास आवडायचे.आकाशवाणीवर सकाळी प्रसारण होणाऱ्या अस्मिता या कार्यक्रमात ते नित्य नेमाने फर्माईशी कळवत.४० वर्षीय त्यांची फियाट ते आवडीने मेन्टेन करत आणि तितक्याच आवडीने तिच्या ड्रायव्हिंग चा आनंद घ्यायचे. निसर्गरम्य वातावरणात फिरायचे आणि निसर्गाचे फोटो काढायचे हा त्यांचा आवडीचा छंद होता.

सेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवेला वाहून घेतलेले, सामाजिक भान असणारे,सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ.गोविंद गुणे यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार बाळाराम पाटील,शेकाप चे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, डॉ.नितीन म्हात्रे,डॉ.विजय सदाशिव भगत,डॉ. आमोद दिवेकर,डॉ.सी डी कुलकर्णी,सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे, वि. खं. विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य आनंद धुरी, युवा नेता बबन विश्वकर्मा, अविनाश मकास, संतोष घोडींदे, ऋषिकेश बुवा, प्रीतम कैय्या,विक्रम कैय्या आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन,डॉ.गिरीश गुणे यांचे सांत्वन केले.

रुग्णसेवेचा हा वसा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नसल्याने गुणे हॉस्पिटल अखंडपणे सुरूच राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने आपण निर्बंध पाळले पाहिजेत, त्यामुळे सांत्वनासाठी आमची व्यक्तिशः भेट घेणे टाळावे असे डॉ गिरीश गुणे यांनी समस्त जनतेला आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.