Press "Enter" to skip to content

पोलादपूर नगरपंचायतीच्या दोन्ही टप्प्यातील निवडणुकीत जाहिरनामे दूर्लक्षितच

भाजपचा सरस, काँग्रेस आघाडीची वचने अन् सेनेची वचनपूर्ती व आश्वासने, मनसेचा वचकनामा

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

नगरपंचायत पोलादपूरच्या विकासाची पहिली संधी शिवसेनेच्या निर्विवाद नगरसेवक संख्येला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आश्वासनांचा वचननामा आणि कार्यपूर्तीची यादी जाहिरनाम्यात देण्यात आली आहे. काँग्रेसकडून वचननामा असा उल्लेख करून काही आश्वासनांची यादी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचा जाहिरनामा सर्व जाहिरनाम्यांमध्ये सरस असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचकनामादेखील वाचनीय झाला आहे.

पोलादपूर नगरपंचायतीच्या शिवसेनेला पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुर्ण बहुमताची सत्ता प्राप्त झाल्याने जाहिरनाम्यामध्ये वचननामा आणि वचनपूर्तीची यादी नमूद करण्यात आली आहे. मात्र, काही प्रभागातील न झालेल्या कार्यपूर्तीबाबत विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असून प्रचारात या मुद्दयांचा वापर प्रभावीपणे करण्यात आला आहे. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने नगरपंचायतीमध्ये चंचूप्रवेशदेखील न केल्याने यंदा ‘आर या पार’ची लढाई दोन्ही पक्षांना करावी लागणार असल्याचे दिसून येत असताना दोन्ही पक्षांनी चांगल्याप्रकारे जाहिरनामे प्रसिध्द केले.

शिवसेनेकडून जाहिरनाम्यामध्ये 39 कार्यपूर्तीचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. यापैकी अनेक मुद्दे प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याने त्या-त्या प्रभागातील उमेदवाराच्या विरोधात या जाहिरनाम्याने काम केल्याचे दिसून आले आहे. मात्र, वचननामा देताना शिवसेनेने नवीन पाणीपुरवठा व फिल्टरेशन प्लांट, नगरपंचायत भवन, कचरा संकलन व विलगीकरण, पंपघर व नवीन मुख्यवाहिनी तसेच नवीन विस्तारवाहिनीमधून काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे वचन, नगराच्या स्वागत कमानी, नदीलगतच्या लोकवस्तीसाठी सोलर पथदिवे, ओपन योगा जीम सेंटर, वाहून गेलेली जॅकवेल तात्काळ बांधून नळयोजना बसविणार अशा वचनांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेकडून 17 प्रभागांपैकी 16 प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे वचननामा असा उल्लेख का करण्यात आला हे अनाकलनीय असले तरी सुसज्ज प्रशासकीय इमारत, शिवाजी नगर सैनिक नगर गावठाण प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा प्रयत्न, नागरिकांचा विमा, खुली व्यायामशाळा, अग्निशमनदल, नाटयगृह, सुलभ शौचालय, सांडपाणी व घनकचरा नियोजनाची चर्चा करण्यात आली आहे. आघाडीकडून सर्व 17 प्रभागांमध्ये उमेदवारी देण्यात आली असून आघाडीची उमेदवारसंख्या 18 आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या 4 तर काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या 14 आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय मुद्देसूद निवडणूक जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये विकास आराखडा शासनाकडून मंजूर करून घेणे, बाजिरे धरणातून पाणीपुरवठयासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा, प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतागृहांच्या इमारती, कचरामुक्त शहरासाठी अत्याधुनिक यंत्रणा, नवीन घरबांधणी आणि घरदुरूस्तीच्या परवानगीमध्ये पारदर्शकता आणून अनधिकृत बांधकामांवर आळा बसविणार, मोबाईल जनरेटरद्वारे पाणीपुरवठा, प्रत्येक प्रभागामध्ये गरजेप्रमाणे सौरऊर्जा दिवे आणि हायमास्ट दिवे, सावित्री व चोळई नदीत संरक्षक भिंती, सर्व घरधारकांना मिळकतपत्रे तसेच जन्म मृत्यू दाखले घरपोच, बेरोजगार युवकांसाठी रोजगार व वाहतुकीचे योग्य नियोजन अशा मुद्दयांचा उहापोह करणाऱ्या या जाहिरनाम्यामध्ये नगरपंचायतीची कक्षा वाढविण्याचा प्रयत्न हा सर्वात महत्वाचा मुद्दा दिसून येत आहे. एकूण 12 जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या भाजपाने यंदा मोठया प्रमाणावर मतांची बेगमी करण्यासोबतच नगरपंचायतीमध्ये चंचूप्रवेशाची मानसिकता बाळगली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा केवळ 3 जागांवर उमेदवार उभे करताना प्रभाग 17 मध्ये प्रतिष्ठेची लढत केल्याचे दिसून आले आहे. मनसेचे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांनी केलेल्या सामाजिक कामांचा उल्लेख मोठया प्रमाणात असलेल्या वचकनाम्यामध्ये दिसून येत आहे. मात्र, तरीदेखील लोकांच्या समस्या व सुचना ऐकून घेण्यासाठी 60 दिवसांतून प्रभाग सभा, हाकेच्या अंतरावर रास्तभाव धान्य दुकान, सौरऊर्जेवरील पथदिवे, प्रभाग 17 मधील स्मशानभूमी नूतनीकरण, जोगेश्वरी गाडीतळ येथे बसथांबा, कचरामुक्त नदीपात्र, गटारे व रस्ते दर्जेदार व मजबुत, प्रभागाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमानी, बालउद्यान व क्रीडांगण, मासेविक्रीची बाजारपेठ आणि सीसीटिव्ही यंत्रणा अशा मुद्दयांचा समावेश वचकनाम्यामध्ये दिसून येत आहे.

शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, भाजपा आणि मनसे यांच्या जाहिरनाम्यामध्ये अनेक मुद्दे साम्यदर्शक असून केलेल्यांना चुकण्याचा हक्क असल्याप्रमाणे शिवसेनेच्या जाहिरनाम्यात चुका दिसून येत आहेत. निवडणुक जाहिरनाम्याचा प्रभाव साधारणपणे प्रभागामधील मतांची संख्या वाढण्यावर दिसून येत असल्याने मागील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर यावेळी कोणत्या पक्षाला किती मते मिळतील, हे निवडणूक जाहिरनाम्यामुळे ठरण्याचा प्रकार पहिल्या टप्प्यामध्ये सर्वच पक्षांचे निवडणूक जाहिरनामे मतदारांकडून दूर्लक्षित राहिल्याने दुसऱ्या टप्प्यात तरी मतदार या जाहिरनाम्यांचे अवलोकन करू शकतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.