सिटी बेल लाइव्ह / माथेरान / प्रतिनिधी #
नगरपरिषदेत सन २०१६ मध्ये शिवसेनेची स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी एकूण १४ सदस्य जनतेमधून निवडून आले होते तर शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना अडीच,अडीच वर्षांसाठी स्वीकृत सदस्य पद देण्यात आले होते.२०१६ च्या त्या निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षासह, आरपीआय यांनी सुध्दा बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआयच्या प्रमुखांना पुढील काळात अडीच वर्षे स्वीकृत सदस्य पद देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते.सुरुवातीच्या काळात या पदावर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून चंद्रकांत जाधव आणि ऋतुजा प्रधान यांची अडीच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती.तर उप नगराध्यक्ष पद आकाश चौधरी यांना दिले होते. हे पद सुध्दा त्याचप्रमाणे अडीच वर्षांसाठी विभागून देण्याचे ठरले होते.परंतु पक्षातील अंतर्गत मतभेद आणि सुरुवातीपासून जुन्या नव्याचा वाद आतल्या गोटातुन धुमसत होता त्यामुळे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीसुद्धा स्वीकृत आणि उपनगराध्यक्ष ह्या पदांचा संबंधित पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यात आला नव्हता.याला जबाबदार सुद्धा अंतर्गत मतभेद आहेत.
त्यातच पक्ष कार्यकारिणी मध्ये बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात होते. आणि आपापसतील वाद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी पक्षाच्या वरिष्ठांसोबत याबाबत दि. १ जुलै रोजी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती त्यावेळेस स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांना सुपूर्द केला होता.उर्वरित एक स्वीकृत पद आणि उप नगराध्यक्ष यांचे राजीनामे लवकरच सादर होणे अपेक्षित होते परंतु पाच दिवस झाले तरीसुद्धा याबाबतीत काही चित्र स्पष्ट झालेले दिसत नाही. अडीच वर्षानंतर सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे शफीक शेख यांना स्वीकृत सदस्य पद देण्याबाबत ठरल्याचे समजते तर उप नगराध्यक्ष पदासाठी सुध्दा अनेक जण इच्छुक दिसत आहेत.परंतु राजीनामा नाट्य केव्हा संपुष्टात येऊन या पदांवर कुणाकुणाची वर्णी लागणार आहे याबाबत सध्या गावात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Be First to Comment