शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मागणीची पनवेल महानगरपालीकेकडून दखल
हजेरी बुथ करीता कंटेनर केबिन खरेदी करणार, सार्वजनिक शौचालय आणि मुतारी व निवाऱ्याची सोय होणार
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना हजेरीसाठी त्याचबरोबर निवारा म्हणून या व्यतिरिक्त सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा मिळत नाही. याबाबत शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र देऊन कामगारांना या सुविधा पुरवण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार मनपा विविध ठिकाणी कंटेनर केबिन खरेदी करणार आहे. महा सभेसमोर हा ठराव मांडण्यात येणार आहे.
पनवेल मनपा हद्दीत एकूण वीस प्रभाग आहेत. प्रभागानुसार एकूण 20 स्वच्छता निरीक्षक आणि चार आरोग्य निरीक्षक कार्यरत आहेत. पनवेल मनपाकडे कायम आणि कंत्राटी असे सुमारे 1723 स्वच्छता विषयक कर्मचारी काम करतात. मात्र त्यांना हजेरी व प्रसाधनासाठी कोणतीही सोय प्रभागांमध्ये उपलब्ध नाही.
याबाबत कर्मचारी व संघटना यांच्याकडून वारंवार मागणी होत होती. स्वच्छता दुतांच्या या गैरसोय बाबत शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार प्रशासनाने ठिक ठिकाणी कंटेनर केबिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
महासभेसमोर ठराव सुद्धा मांडण्यात येणार आहे. विषय पत्रिकेमध्ये हा विषय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रभागातील सरासरी 50 ते 100 सफाई कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी घेण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना शौचालय, मुतारी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणार आहे. त्यांना त्यांचे साहित्य सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. याव्यतिरिक्त स्वच्छता निरीक्षकांना त्या प्रभागात बसण्याची सोय केली जाणार आहे. जेणेकरून त्यांचा जनसंपर्क वाढून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर होईल.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अशाप्रकारे एकूण 18 केबिन बसवण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी एक कोटी 40 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेस मंजुरी देण्याच्या अनुषंगाने विषय ठेवण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका प्रशासनाने सहानभूती पूर्वक विचार करून स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना ही सुविधा निर्माण करून देण्याच्या अनुषंगाने जो पुढाकार घेतला याबाबत रामदास शेवाळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय नियमाप्रमाणे इतर सोयीसुविधा त्यांना पुरविण्यात याव्यात अशा प्रकारची न्याय मागणी पुन्हा एकदा शेवाळे यांनी केले आहे.








Be First to Comment