Press "Enter" to skip to content

नागोठण्यात जागतिक अपंग दिन सोहळा

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या मागे आमची शक्ती नेहमीच उभी राहील : वैंकूठशेठ पाटील

जागतिक अपंग दिन सोहळा नागोठण्यात उत्साहात : विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

समाजामध्ये वावरत असतांना आपण पाहतो की, इतरांपेक्षा वेगळी अशी एक अलौकिक शक्ती, एक वेगळी ताकद दिव्यांग व्यक्तीमध्ये असते. त्यांना असलेली अद्भुत ताकद ही निसर्गाची देणगी आहे. याचा प्रत्यय आपण पॅरा अॉलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दिव्यांग स्पर्धकांच्या रूपाने येतो. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आमची शक्ती त्यांच्या मागे नेहमीच उभी राहील असे आश्वासन रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैंकूठशेठ पाटील यांनी दिले. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू प्रणित प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने नागोठण्यात प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक अपंग दिन सोहळ्यात ते बोलत होते.

नागोठणे ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रहार क्रांती संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल, नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर, वरवठणे सरपंच ॠतुजा म्हात्रे, नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई, सुनील घनमोडे, रमाताई चौगुले, दीपक घाग सामाजिक कार्यकर्ते सिराजभाई पानसरे, सुभाष पाटील, गणपत ल. म्हात्रे, प्रहार क्रांती संस्थेचे रोहा तालुका अध्यक्ष मेहबूब अत्तार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी इंदापूर येथील रविंद्र सांगळे, पनवेल येथील अपेक्षा गुरव यांची जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी, पनवेलच्या नीलम वाघमारे यांची जिल्हा महिला उपाध्यक्षपदी तर विद्या अन्नपूर्णा यांची जिल्हा महिला सचिवपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना सुरेश मोकल म्हणाले की, आपल्या संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडूंची ताकद आपल्या मागे असली तरी प्रत्येकाला आपले संरक्षण करता आले पाहिजे. पोलीस ठाण्यात दिव्यांगांच्या तक्रारींची दाखल घेत नसल्याचे अनुभव असून त्यासाठी दिव्यांग कायदा २०१६ सर्वांपर्यंत पोचणे गरजेचे असल्याचेही मोकल यांनी स्पष्ट केले. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी ग्रामपंचायतीकडून येथील दिव्यांग बांधवांसाठी कोरोना काळात राबविलेल्या स्तुत्य उपक्रमांची माहिती देऊन यापुढेही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. तर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई यांनी दिव्यांग हे मानाने खंबीर असतात. प्रयत्न ही तरुणांची ओळख दिव्यांग बांधव जपत असल्याचे सांगून दिव्यांग हे कुठेही कमी नसतात हे त्यांनी सोदाहरण सांगितले. तसेच पोलीस प्रशासन नेहमीच आपल्यासोबत राहील असे आश्वासित केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोध धाडसे, प्रेरणा कडव या पदवीधर व सुहाना कोरटकर(१०वी), चित्रा मढवी(१२वी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर ओव्हाळ यांनी तर आभारप्रदर्शन नितीन म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे रोहा तालुक्याचे अध्यक्ष मेहबूब अत्तार, पदाधिकारी नितीन म्हात्रे, अविनाश पाटील, मुनाफ शेख, संकेत पाटील, रोहन तळेकर आदींसह सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.