Press "Enter" to skip to content

रोह्यातील वादग्रस्त प्लॉट प्रकरणाला नवे वळण; विकासकाला नगर परिषदेची कारणे दाखवा नोटीस

रोहा : प्रतिनिधी

रोहा : मौजे रोहा येथील मो.र. नं. ७२/१९७८, सर्व्हे नं. ६१ मधील प्लॉट नं. ८ संदर्भात कथित खोटे अभिलेख तयार करण्यात आल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत रोहा अष्टमी नगर परिषदेने संबंधित विकासक श्री. ओमकार मोहिते यांना सविस्तर खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरात चर्चेत असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, रोहा यांच्या निर्देशानुसार नगर परिषदेकडून या प्रकरणाची प्राथमिक छाननी सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्लॉटच्या अभिलेखांमध्ये विसंगती असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, संबंधित विकासकाने आठ दिवसांच्या आत शासकीय मोजणी नकाशा, भूमी अभिलेख विभागाकडील प्रमाणित मोजणी अभिलेख, मंजूर ले-आऊट नकाशा, मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगीसंबंधी अभिलेख तसेच तक्रारीवरील सविस्तर लेखी खुलासा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित कागदपत्रांच्या आधारे प्लॉटचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ, हद्दी तसेच अभिलेखांची सत्यता तपासण्यात येणार आहे. तसेच तक्रारीतील मुद्द्यांबाबत विकासकाचे म्हणणे आणि त्यास पूरक पुरावेही विचारात घेतले जाणार आहेत.

निर्धारित मुदतीत कागदपत्रे आणि खुलासा सादर न झाल्यास उपलब्ध अभिलेखांच्या आधारे नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणातील निष्कर्षांकडे आता शहरातील नागरिकांसह बांधकाम क्षेत्राचेही लक्ष लागले असून पुढील कार्यवाहीतून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.