
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या ; विमानतळ परिसरात आंदोलन
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी विमानतळ परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून नामकरणाच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, ही संपूर्ण रायगड आणि नवी मुंबई परिसरातील जनतेची भावना आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जनभावनेची आठवण करून देण्याचा आणि नामकरणाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, स्थानिक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान उपस्थितांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोरदारपणे मांडली. शासनाने जनभावनेचा सन्मान करून विमानतळाच्या नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



Be First to Comment