Press "Enter" to skip to content

सामाजिक उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा

आमदार बाळाराम पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने विविध विकास कामांची उद्घाटने संपन्न

सिटी बेल | पनवेल |

जन्मदिनाच्या निमित्ताने आपण समाजाचे ऋण फेडले पाहिजे, गरजवंताला मदत केली पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची पहिल्यापासून उदात्त भूमिका राहिली आहे. त्याचमुळे वाढदिवसाचे भडक किंवा भपकेबाज प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमांच्या द्वारे वाढदिवस नेहेमीच साजरे केले जातात.त्याचीच प्रचिती शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी आली. आमदार बाळाराम पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते सर्व उद्घाटन संपन्न झाली.

यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी,सदस्य विलास फडके, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल चे सभापती डॉक्टर दत्तात्रेय पाटील,पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या वृषाली देशेकर,सुभाष भोपी आदी मान्यवरांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याची सुरुवात वलप येथून करण्यात आली. वलप येथील गणेश नगर च्या रस्त्याचे भक्कम बांधकाम पूर्ण झालेले असून ते रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पाले खुर्द ते वावंजे पी एस सी जोड रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर वाकडी ते दुंदरे या रस्त्यातील 248 ते 500 पर्यंत चा टप्पा पूर्ण झालेला असून, त्या टप्प्याचे उद्घाटन फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. रिटघर ते खानाव या दरम्यान सिमेंट कॉंक्रीटचा भक्कम रस्ता बनविण्यात आलेला असून या रस्त्याचे काम देखील जिल्हा नियोजन समिती,रायगड यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यानंतर भिंगार जोड रस्त्याचे देखील मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

भिंगार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 वा वित्त आयोग अंतर्गत जवळपास पाच लाख रुपयांचा निधी खर्चून अंतर्गत रस्ते सिमेंट काँग्रेसचे बनविण्यात आले आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रमात या रस्त्यांचे लोकार्पण देखील या समयी करण्यात आले.

यावेळी आपल्या भावना प्रकट करताना शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील म्हणाले की, आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये गेल्या सहा महिन्यात आम्ही दोन कोटी रुपयांची विकासकामे करून दाखविली आहेत. आगामी आठवड्याभरात सुमारे पावणे पाच लाखांच्या विकास कामांचे आम्ही नियोजन करणार आहोत. यंदाचे वर्षी आमदार बाळाराम पाटील जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा साजरा करणार नाहीत. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे 29 डिसेंबर रोजी ते कार्यमग्न असणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी ते काही काळ पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. जन्मदिनाचे औचित्य साधून विकास कामांच्या उद्घाटनाची उद्घोषणा करताना अत्यंत समाधान लाभत आहे. समाजोपयोगी कार्यातून आपले वाढदिवस साजरे करावेत ही शेतकरी कामगार पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शिकवण दिली आहे.

या कार्यक्रमाला भिंगार ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर ठाकूर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी चिटणीस जगन्नाथ पवार, दीपक पाटील, संदीप घोगरे, प्रकाश पाटील, बंधू मोरे, सुरेश वाघमारे, आदिनाथ गायकर, भरत पाटील, विमल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील, हिरामण खेत्री, वसंता गायकर, राजेंद्र गायकर, पांडुरंग पाटील शांताराम पवार आदी मान्यवर यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.