Press "Enter" to skip to content

पहिल्या टप्प्यात ‘त्रिशंकू’ची खात्री अन् इच्छुकांची भाऊगर्दी

पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील आरक्षण सोडतीमुळे राजकीय कलाटणी

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे स्वरूप नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारांच्या प्रभागात अचानक निवडणुक रद्द झाल्याने पोटनिवडणुकीसारखे झाले होते. या पोटनिवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची आरक्षण सोडत जाहिर झाल्यानंतर इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून त्रिशंकू अवस्थेत असलेल्या राजकीय परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक गल्लाधारी इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या पक्षासमोर स्थिर सत्ता देण्यासाठी उमेदवारीची मागणी सुरू केली आहे. यामुळे चारही प्रभागांमधून अनेक इच्छाधारी उमेदवार वंचित राहून गल्लाधारी उमेदवारांनाच संधी मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षणाच्या प्रभाग 2 मधून शिवसेनेकडून माजी सरपंच मनोज प्रजापती, आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून कल्पेश मोहिते, प्रभाग 8 मधून सेनेकडून रिमा बुरूणकर तर आघाडीकडून अनिता जांभळेकर, प्रभाग 10मधून सेनेकडून संगिता इंगवले, आघाडीकडून शुभांगी चव्हाण, मनसेच्या प्रज्ञा सुर्वे, प्रभाग 14मधून माजी नगराध्यक्ष निलेश सुतार तर आघाडीकडून प्रकाश भुतकर आणि भाजपाकडून अंकिता जांभळेकर असे उमेदवारी अर्ज दाखल करून झाल्यानंतर छाननीमध्ये हे सर्व अर्ज वैध ठरले असताना अचानक झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे या चारही प्रभागातील निवडणुकप्रक्रिया स्थगित झाल्या.

मंगळवारी सायंकाळी 13 प्रभागांमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्तेचे दावे करण्यात आले तरीदेखील भाजपाच्या प्रभावामुळे दोन्ही राजकीय पक्षांना त्रिशंकू अवस्थेची जाणीव झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीनेही पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये त्रिशंकू अवस्था असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुढील दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे.

गुरूवारी पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नामाप्र आरक्षणाच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत पुन्हा काढण्यात आल्यानंतर प्रभाग 2 आणि प्रभाग 10 मध्ये सर्वसाधारण स्त्री अथवा पुरूष आणि प्रभाग 8 आणि 14 मध्ये सर्वसाधारण महिला उमेदवारांची सोडत निघाली आहे. यामुळे पुर्वीच्या आरक्षणातील इच्छाधारी उमेदवारांसमोर गल्लाधारी उमेदवारांचे आव्हान उभे राहिले आहे. सर्वसाधारण आरक्षणानुसार नागरिकांचे मागासप्रवर्ग उमेदवारही देता येणार असूनसुध्दा या आरक्षणातून सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारच देण्याचा अट्टाहास केला जाणार असल्याने याठिकाणी इच्छाधारी उमेदवारांना पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळण्यापासून वंचित ठेवले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने या चारही प्रभागांमध्ये काळजीपूर्वक व्यूहरचना करून त्रिशंकू अवस्थेतून सत्तेची गणितं जमवून आणण्याचा निर्धार केला असून शिवसेनेने प्रचारसभेमध्ये पूर्वीचेच नामाप्र उमेदवार हे संभाव्य उमेदवार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, भाजपाने 13 मध्ये केवळ दोन-तीन जागांची अपेक्षा करून उर्वरित चार जागांपैकी किमान दोन जागांवर निकाराची लढत देण्यासाठी मातब्बर आणि प्रशासन चालविणारा चेहरा असलेल्या उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसदेखील प्रशासन चालविण्याचा अनुभव असणाऱ्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी आघाडीसमोर प्रस्ताव देणार आहे. मनसेकडून चारपैकी दोन जागांवर उमेदवार उभे केले जाणार असून अभासेनेकडूनही पुन्हा एका जागेसाठी उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता आहे.
मात्र, मातब्बर उमेदवार देताना त्रिशंकू अवस्थेकडून निर्विवाद सत्ताधारी होण्यासाठी काही गल्लाधारी उमेदवार सर्वच पक्षांकडून सरसावले असून त्यांना उमेदवारी दिल्यास स्थानिक इच्छाधारी उमेदवारांना तोंड बंद करून बसावे लागणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.