पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांच्या निवडणुकीसाठी 71.09 टक्के मतदान ; 4 प्रभागांच्या निवडणुकांनंतर मतमोजणी
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या मतदान प्रक्रियेमध्ये 71.09 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती निवडणुक विभागाने दिली आहे. दरम्यान, माजी सभापती दिलीप भागवत यांच्यासह माजी नगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पार्टे यांच भवितव्य इव्हिएममध्ये बंद झाले असून 4 प्रभागांच्या निवडणुकांनंतर मतमोजणी होणार असल्याने आता नव्याने निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.
पोलादपूर नगरपंचायतीची 17 प्रभागांची एकूण मतदार संख्या 4 हजार 799 असून यामध्ये एकूण 2300 पुरूष आणि 2499 महिला मतदारांचा समावेश आहे. मात्र, 13 प्रभागांच्या मतदानप्रक्रियेमध्ये 1731 पुरूष आणि 1915 स्त्रिया अशा एकूण 3646 मतदारांचा समावेश होता. यापैकी 1 हजार 272 पुरूष आणि 1 हजार 320 महिलांनी अशा एकूण 2 हजार 592 मतदारांनी मतदान केल्याने एकूण टक्केवारी 71.09 झाली आहे.
प्रभात 1 मध्ये 471 पैकी 86 मतदान झाले असून 18.26 टक्केवारी आहे. प्रभाग 3 मध्ये 227 मतदारांपैकी 185 मतदारांनी मतदान केल्याने 81.50 टक्के मतदान झाले. प्रभाग 4 मध्ये 452 मतदारांपैकी 323 जणांनी मतदान केले असून 71.46 टक्के मतदान झाले झाले आहे. प्रभाग 5 मध्ये 292 मतदारांपैकी 197 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ही टक्केवारी 67.47 झाली आहे. प्रभाग 6मध्ये एकूण मतदार 245 असून 187 मतदान झाल्याने 76.33 टक्के मतदान झाले आहे. प्रभाग 7 मध्ये 354 एकूण मतदार असून त्यापैकी 285 मतदारांनी हक्क बजावल्याने 80.51 टक्के मतदान झाले आहे. प्रभाग 9 मध्ये 241 मतदारसंख्या असून 186 मतदारांनी मतदान केल्याने 77.18 टक्के मतदान झाले. प्रभाग 11 मध्ये एकूण मतदान 294 असून 243 मतदान झाले असून 82.65 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. प्रभाग 12 मध्ये 188 मतदारांपैकी 150 मतदारांनी हक्क बजाविला. ही टक्केवारी 79.79 मध्ये झाली आहे. प्रभाग 13 मध्ये 246 मतदानापैकी 207 मतदान होऊन 74.15 टक्के नोंद झाली आहे. प्रभाग 15 मध्ये एकूण मतदान 289 असून 239 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला ही टक्केवारी 82.70 आहे. प्रभाग 16 मध्ये एकूण मतदार 123 असून त्यापैकी 107 मतदान झाले असून 86.99 टक्केवारी झाली आहे. प्रभाग 17 मध्ये एकूण मतदार 224 असून 197 मतदारांनी हक्क बजाविला असून मतदानाची टक्केवारी 87.95 झाली आहे.








Be First to Comment