शिक्षणाची वाडी -दिविवाडी या उपक्रमासोबत माणुसकी प्रतिष्ठानचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
कोविड १९ या महामारी मुळे संपूर्ण देशात शिक्षणाची मोठी हानी झालेली दिसून येते. कोरोना मध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक मूलभूत अध्ययन कौशल्य व गणिती संबोध विस्मरणात गेल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग व उपक्रमांना चालना देण्यासाठी गुणवत्ता विकास कक्ष सुरू केला आहे. उपक्रमशील, तंत्रस्नेही व आदर्श शिक्षक संदीप दत्तात्रय वारगे यांना जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त करून जिल्हा व तालुका स्तरावर टास्कफोर्स तयार केले आहेत.
वारगे यांनी स्वतःच्या शाळेपासून सुरुवात करीत या उपक्रमामुळे एक आदर्श जिल्ह्यासाठी घालून दिला आहे. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत “शिक्षणाची वाडी -दिवीवाडी” या शीर्षकाखाली अनेक शैक्षणिक तक्ते व वर्गामध्ये Learning By Doing या अभ्यास पद्धतीने वापरता येतील असे कृतिशील तक्ते बनवून विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकण्यास प्रवृत्त केले आहे. त्याच सोबत विद्यार्थ्यांना पुस्तकाचे ओझे वाटू नये म्हणून उपयुक्त स्वयं अध्ययन फाईल तयार करून इयत्ता ३री/४थी च्या आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. इंग्रजी विषयाचे वाचन लेखन सोपे व जलदगतीने व्हावे यासाठी स्वलिखित “साथी हस्तपुस्तिका” वितरण सरपंच ग्रुप ग्राम पंचायत बेलोशी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अलिबाग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले. आय.एस. बी.एन प्रमाणित सदरची हस्तपुस्तिका अमेझॉन, फ्लिपकार्ड, ज्ञानगंगा याठिकाणी ऑनलाईन उपलब्ध आहे.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत वाजत गाजत करण्यात आले. यावेळी इयत्ता तिसरीचा विद्यार्थी राज नाईक याने शारीरिक कसब दाखवत सर्वांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन बेलोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा भोपी, अलिबाग पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी प्रकाश कोकाटे, विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा, केंद्रप्रमुख उदय ठाकूर,सकाळ वृत्तपत्र समूहाचे पत्रकार प्रमोद जाधव, पंचायत समिती पशुसंवर्धन विभागातर्फे जोशी, साधन व्यक्ती रविंद्र वर्तक, नेहा मगर, निलिमा वर्तक, बेलोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक भोईर व आदर्श शिक्षक आर.डी. नाईक , दिशा ग्राफिक्स चे सी.ई.ओ. नरेंद्र खंडागळे, माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, उपाध्यक्ष सतीश कणसे, सचिव विशाल आढाव, खजिनदार संतोष कणसे,डॉ.शाहिदा अन्सारी सरस नर्सिंग होम, सी.ए. गौरव माळी,सौ थळे, सुधाकर निषाद,मुंबईचे सुप्रसिध्द अर्थोपेडिक डॉ.राहुल शर्मा, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भोनकर सरांनी सर्वांचे स्वागत केले.
दिवीवाडी आदिवासीवाडी ही अलिबाग पासून वीस किलोमीटर असून दुर्गम भागात आहे. तरी सुद्धा माणुसकी प्रतिष्ठानमार्फत अनेक डॉक्टर व मुंबईहून अर्थोपेडिक डॉ. राहुल शर्मा उपस्थित राहून संपूर्ण वाडीवरील आदिवासिंची आरोग्य तपासणी, संधिवात, मणक्याचे आजार, यांची तपासणी केली. व मोफत औषधे सुद्धा दिली. या आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रामराज येथील प्रसिद्ध डॉ. राजेंद्र तुरे यांनी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य भेट दिले.
पंचायत समिती अलिबाग मार्फत चौल-भोवाळे येथील पशू सहाय्यक जोशी यांची विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
“शिक्षणाची वाडी -दिवीवाडी” हा उपक्रम राबवताना शासनाकडून किंवा शाळेच्या कोणत्याही शासकीय निधीवर अवलंबून न राहता श्री संदीप दत्तात्रेय वारगे सरांनी स्वखर्चाने सर्व शैक्षणिक बॅनर, गृह स्वाध्यायाचे साहित्य बनवून मुलांना मोफत स्वरुपात दिले आहे. त्यामुळे सरपंच कृष्णा भोपी, प्रकाश कोकाटे व सर्व उपस्थितांनी सरांचे कौतुक केले.








Be First to Comment