Press "Enter" to skip to content

पोलादपूरकरांनो सावध रहा : दरडी कोसळण्याचा धोका कायम

पोलादपूर तालुक्यातील 15 महसुली गावांवर दरडीची टांगती तलवार

2005 पासून यादी कायमच

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)

तालुक्यातील 15 महसुली गावांवर दरड कोसळण्याची शक्यता असून प्रशासन या नैसर्गिक आपत्ती साठी सज्ज आणि सतर्क असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, 2005 पासून ही यादी कायम असून दरडप्रवण क्षेत्रामध्ये वाढ झाल्याची नोंद अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना इतरत्र होऊनही यादीमध्ये करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलादपूर तालुक्यातील लोहारे, कोतवाल खुर्द, सवाद, चरई, केवनाळे, पार्ले, कोंढवी, सडवली, तुटवली, ओंबळी, महाळुंगे, परसुले, भोगावे येलंगेवाडी, माटवण, हावरे ही पंधरा महसुली गावे पावसाळयामध्ये धरणग्रस्त होण्याची शक्यता असल्याचे सन 2005 भूस्खलनानंतर दरवर्षी प्रशासनाकडून जाहीर केले जात आहे.

याखेरीज, पोलादपूर शहरातील पार्टेकोंड येथील रस्ता आणि नावाळे, वाकण- गोपाळवाडी, कुडपण, कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील काही लोकवस्तीच्या भागांमध्ये रस्ते करताना झालेल्या उत्खननामुळे मोठया प्रमाणात दगडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत.आंबेनळी आणि कशेडी घाटरस्ता रूंदीकरणावेळी डोंगर बाजूचे उत्खनन तसेच ब्लास्टिंग केल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम निर्माण झाला आहे. 2005 साली झालेल्या अतिवृष्टी नंतर भूस्खलनामुळे कोतवाल खुर्दमधील नऊ व्यक्तीचा बळी गेला होता तर कोंढवी गावातील अनेक घरांना आणि जमिनीला भेगा पडल्या होत्या. लोहारे पवारवाडी येथे जमीन दुभंगून दोघांचा बळी गेला होता. यानंतर नैसर्गिक आपत्ती निवारण कायद्यानुसार दरवर्षी दरडग्रस्त गावांची यादी जाहीर करून प्रशासनाकडून धोका असणारी लोकसंख्या स्थलांतराचे ठिकाण संपर्क अधिकारी अथवा कर्मचारी यांची नित्यनेमाने यादी जाहीर केली जात आहे.मात्र, वाढीव दरडप्रवण क्षेत्राचा या यादीमध्ये उल्लेख दिसून येत नाही, आश्चर्याची बाब मानली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.