शिक्षकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून केला शाळा प्रशासनाचा निषेध
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
जेएनपीटी विद्यालय व पालकांच्या संभ्रमामुळे मात्र विद्यार्थ्यांचे हाल होऊन त्यांना शाळे ऐवजी भर रस्त्यावर उभे राहण्याची शिक्षा सहन करावी लागली होती. तरी याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जेएनपीटीची शाळा आर. के. फाउंडेशन मार्फत चालविली जात आहे. कोव्हीड काळामध्ये बंद असलेल्या शाळा आजपासून उघडण्यात आल्याने पालक मुलांना घेऊन शाळेत आले. परंतु शाळेचा गेट बंद पाहून पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर शिक्षकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून शाळा प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शिक्षकांनी आपल्या व्यथा पत्रकारांसमोर मांडत शासनाच्या धोरणानुसार शिक्षकांना पगार व इतर सोयीसुविधा मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.

याबाबत शाळेचे व्यवस्थापक मनोज सावळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळेच प्राथमिक शाळा आई. इ. एस. शाळेत हलविली होती. याची पूर्वसूचना मुख्याध्यापकांना देण्यात आली होती. मात्र ती अमलात न आल्याने हा घोळ निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न झाल्याने निर्माण झालेल्या संभ्रमामुळे आज सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र शाळेच्या गेट बाहेर भर रस्त्यावर उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली होती. शाळा प्रशासनाने शिक्षकांबरोबर पालकांना व त्यांच्या संघटनेला यापुढे पूर्वसूचना देण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही असे पालकवर्गाची मागणी आहे. आजच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








Be First to Comment