काँग्रेसची तीन प्रभागातून तर शिवसेनेची एका प्रभागातून माघार
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची तीन प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या हेतूने माघार घेतली गेली आहे. शिवसेनेकडून प्रभाग 9 मध्ये भाजप उमेदवारासाठी माघार घेण्यात आल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणूक पश्चात राजकारणाला विलक्षण कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसून येत आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 9 मधून शिवसेनेच्या सारिका पालकर यांनी माघार घेतल्याने आता तिथे भाजपाची काँग्रेससोबत लढत होणार आहे. मात्र, या प्रभागासह संपूर्ण पोलादपूर शहरामध्ये भाजपाची शिवसेनेसोबत युती नसताना भाजपाला वाट मोकळी का करून देण्यात आली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसने पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी या प्रभाग 9 मधून शुभांगी चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रभाग 11 मधील उमेदवार आयुषी पालकर यांना शिवसेनेने प्रभाग 9 मधूनदेखील उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळी शुभांगी चव्हाण यांनी एकहाती लढत जिंकताना दुसरीकडे प्रभाग 11 मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवून शिवसेनेच्या आयुषी पालकर विजयी झाल्या होत्या. यामध्ये तडजोडीच्या ज्या भूमिका झाल्या त्यांचा उत्तरार्ध यंदा पाहण्यास मिळेल अशी अपेक्षा असताना या निवडणुकीमध्ये आयुषी पालकर यांच्याच जाऊबाई सारिका पालकर भागवत यांनी प्रभाग 9 आणि प्रभाग 11 मधून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. मागीलवेळी एकतर्फी लढत झालेल्या प्रभाग 9 मध्ये यावर्षी तिरंगी लढतीची शक्यता दिसून येत होती. या अनुषंगाने कोणतीही राजकीय तडजोडीची भुमिका होईल, अशी कुजबूज सुरू असताना मागीलवेळीच्या तडजोडीला तिलांजली दिली जाईल, अशी चिन्हे दिसून येऊ लागली. मात्र, अचानक सारिका पालकर यांनी प्रभाग 9 मधील उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतल्याने आता भाजपच्या मंजू मोरे विरूध्द काँग्रेसच्या तेजश्री गरूड अशी लढत प्रभाग 9 मध्ये होणार आहे. यामुळे सारिका पालकर यांना प्रभाग 11 मध्ये कोणत्या प्रकारचा लाभ होणार, हे राजकीय समीकरण गुलदस्त्यात राहिले आहे.
काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकपूर्व आघाडी करण्यात यश मिळविले आहे. काँग्रेसने तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या चारपैकी तीन जागांवरील उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एका जागेसाठीची खेळीमेळीची लढत मागीलवेळेप्रमाणे शिवसेनेला कोणत्या जागेवर लाभदायक ठरण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न होणार अथवा कसे, हे स्पष्ट झाले नसले तरी मागील वेळी काँग्रेसने शेकाप मनसे आघाडीतील प्रभाग 11मध्ये प्रभाग 10 मधील खेळीमेळीतील लढतीमुळे शिवसेनेला मदत केली होती, हा इतिहास दूर्लक्षित करण्याजोगा नाही. प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माधुरी महेंद्र विचारे यांच्या उमेदवारीसोबत काँग्रेसच्या अपर्णा अमित कदम यांचीही उमेदवारी असून शिवसेनेच्या स्नेहा मेहता यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील खेळीमेळीच्या लढतीमध्ये होणाऱ्या काँग्रेसी मतांच्या विभाजनाचा लाभ देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता दिसून येत आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्षाने प्रभाग 13 मध्ये सचिन दुदुस्कर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे सिध्देश शेठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पवार आणि भाजपाचे प्रसन्ना पालांडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग 15 मध्ये काँग्रेस उमेदवार शिवराज पार्टे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिलकुमार भोसले यांना ताकद मिळाली आहे. येथे शिवसेनेने विनायक दिक्षित यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने एकनाथ कासुर्डे यांना उमेदवारी दिली आहे. या तिरंगी लढतीमुळे काँग्रेसची आघाडीची भुमिका दृष्टीपथात दिसून येत असली तरी मागे एका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालावेळी शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला सभापतींनी भररस्त्यात मारलेली मिठी ज्यांना आठवते, त्यांना या लढतीनंतर शिवसेनेसोबतही दगाफटका करण्याची अनाजीपंतांची खेळी दिसून येणार असल्याची खात्री वाटत आहे.
प्रभाग 16 मध्ये अमित भुवड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित खेडेकर यांना बळकटी आल्याचे राजकीय वर्तूळात अजूनही चित्र दिसून न येत नाही. कारण या प्रभागातून शिवसेनेचे आताचे उमेदवार नागेश पवार यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून निवडून आल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करताना नगरसेवक पदाचा राजिनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक जिंकून नगराध्यक्षपद प्राप्त केल्याचा अनुभव प्रभागातील मतदारांना आहे. शिवसेनाविरोधी मतांची याठिकाणी विभागणी होऊन भारतीय जनता पक्षातर्फे नितीन बोरकर यांची उमेदवारी नागेश पवार यांना उपयुक्त ठरेल अथवा दोन विरोधकांमुळे नागेश पवार यांची उमेदवारी मेटाकूटीस येईल, हे आगामी निवडणुकप्रचारच ठरविणार आहे.
तुर्तास, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगरपंचायत पोलादपूरमध्ये निवडणूकपश्चात अचानक राजकीय समीकरणे बदलू शकतील, अशी परिस्थिती दिसून येत असली तरी मतदारांना तिरंगी लढतीमुळे चांगलाच आनंद मिळत आहे.








Be First to Comment