किशोरी पेडणेकर यांच्याबाबत अश्लील लिखाण करणाऱ्याला तत्काळ अटक करा – शिरीष घरत
सिटी बेल | खारघर |
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. याबाबत किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला. मात्र त्यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात हीन दर्जेच्या भाषेचा वापर करण्यात आलाय. कुटंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. तसेच कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त करून दाखविली. मात्र या घटनेची दखल महाराष्ट्रातील शिवसैनिकांसह नागरिकांनी घेतली आहे. आज या पत्रातील पोस्टल पत्ता असलेल्या खारघर पोलीस ठाण्यात याबाबत तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीला अटक करा अन्यथा रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात भयानक परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत तसेच महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे खारघर पोलिसांकडे दिले आहे.
यावेळी म्हात्रे नामक व्यक्तीने पाठविलेल्या पत्रात अवयवाची विंटबना कऱण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी त्यांचे स्टेटमेंट देताना सांगितले की, आम्हाला धमकीचे पत्र मिळाले. गेले ४० वर्ष आम्ही आमचं चारित्र्य जपलं. पत्रातील भाषा अत्यंत अश्लिल आहे. मी ते पत्र वाचुही शकले नाही. स्त्रियांच्या ज्या भागाचा उल्लेख करु नये अश्या भागांचा उल्लेख या पत्रात केला जातोय. मारुन टाकू, विटंबना करु असे पत्रात म्हटलेय. या घटनेमुळे किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास वेळ लागणार नाही असा इशारा खारघर येथे उपस्थित राहिलेल्या शिवसैनिकांनी दिला आहे.
शिवसेनेच्या मुंबई महापौर व रायगड जिल्हा संपर्क संघटिका सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या बद्दल भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर गुरुवारी महापौर यांच्या जुन्या घरच्या पत्त्यावर अत्यंत हीन भाषेत विजेंद्र म्हात्रे या नावाने लिहलेले विकृताचे पत्र मिळाले. सदर पत्र हे पनवेल मधून व उरण मधून पोस्ट करण्यात आले होते.त्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री.शिरीष घरत साहेब व जिल्हासंघटिका सौ. रेखाताई ठाकरे व उपजिल्हा संघटिका कल्पनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल विधानसभा महिला आघाडी व प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत ज्या व्यक्तीने सदर पत्र पाठवले आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अश्या प्रकारचे निवेदन खारघर येथे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, कलंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख नंदू वारुगसे, प्रशांत जांभूळकर, शिवसेना उत्तर भारतीय सेल गिरीश गुप्ता, युवासेनेचे उपजिल्हा आधीकारी अवचित राऊत, महिला आघाडी च्या विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. सुजाता कदम, उपतालुका संघटिका सौ. टीया धुमाळ, उपमहानगर संघटीका सौ. रीना पाटील, सौ. संचिता राणे, शहर संपर्क संघटिका सौ. नंदा चेडे, सौ. मीना सदरे, शहर संघटिका पारुल सूर्यवंशी, सौ. सानिका मोरे,सौ. अपूर्वा प्रभू, विभाग संघटिका वैशाली सावंत आदी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व युवसेना पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment