चुकीच्या पद्धतीने बस लावल्याने महिला जखमी : पेण स्थानकातील प्रकार
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
एसटी कामगारांचा सुरू असलेला लढा पाहता अद्यापही बसेस सुरू झाल्या नाहीत. शासनाने पगारवाढ देऊनही कर्मचारी हजर नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रवासी पहिलेच मेटाकुटीला आलेले आहेत. अशात पेण एसटी स्थानकात चुकीच्या पद्धतीने बस लावल्यामुळे एक महिला जखमी झाली आहे. मात्र एवढे होऊनही पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली असल्याने पेण आगराला जाग येणार केव्हा ? हा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रायगड विभागाच्या पेण एसटी आगारात 12 वाजण्याच्या सुमारास वंदना पिंपळकर या महिला पनवेल पेण या गाडीतून उतरून घरी निघाल्या होत्या. आगारचा प्रवेशद्वारावर नेहमीप्रमाणे खोपोली गाडी लागलेली होती. तेथून जात असताना तेवढ्यात समोरून अलिबाग पेण गाडी सुद्धा आली. त्यामुळे दोन्ही गाड्यांमधील अंतर कमी उरले होते। चालक गाडी आगारात व्यवस्थित नेत असताना पिंपळकर या गडबडल्या आणि त्यांचा हात खोपोली गाडीच्या दरवाज्यावर आपटल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला इजा झाली.

हा प्रकार समजल्यावर पेण एसटी आगारातील कर्मचारी वर्गची धांदल उडत तो तात्काळ त्या ठिकाणी हजर झाला. त्याठिकाणी हजर असलेले पोलीस हवालदार सुनील फुकणे यांनी महिलेला प्यायला पाणी देऊन तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यात आले. त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला असल्याने याबाबत तक्रार देण्यात आली नाही.
मात्र पेण स्थानकात प्रवेशद्वारावर उभ्या राहणाऱ्या बस म्हणजे चालक व प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परंतु हा प्रकार घडल्यानंतरही परत दुसरी बस तशीच उभी होती. त्यामुळे येरे माझ्या मागल्या असल्याने पेण एसटी आगाराच्या व्यवस्थापकांचे डोळे उघडणार कधी हा प्रश्न आहे. मुळात अलिबाग पेण एसटीची काहीही चूक नव्हती मात्र झालेल्या प्रकाराने ही गाडी थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे अलिबागला जाणारे प्रवासी पुरते कंटाळून वेगळी सोय पाहत गेले. मात्र ही एसटी सुमारे पावणे दोन तास पेण स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती.








Be First to Comment