Press "Enter" to skip to content

बशीर एम.हजवानी फाऊंडेशनच्या वतीने अत्याधुनिक सात रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राष्ट्रभक्त बशीर हजवानींचे समाज सेवेचे कार्य अलौकीकच : खा. सुनील तटकरे यांचे गौरवोद्गार

सिटी बेल | महाड | प्रतिनिधी |

परदेशात राहूनही आपली देशभक्ती व मातृभक्ती मनात ठेवून सामाजिक कार्य करणाऱ्या राष्ट्रभक्त बशीर हजवानी यांचे कार्य अलौकीक असल्याचे गौरवोदगार रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांनी महाड मध्ये काढले.

बशीर एम.हजवानी फाऊंडेशनच्या वतीने अत्याधुनिक सात रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज महाडमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, महाडचे आ. भरतशेठ गोगावले, दापोलीचे आ. योगेश कदम, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार तटकरे बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बशीर एम हजवानी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर हजवानी, अली कौचाली, इकबाल चांदले, अकबर तरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा. तटकरे यांनी बशीर हजवानी हे आर्थिक नव्हे तर मनानेही श्रीमंत आहेत. ज्या संस्थांना या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांनी त्यांचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा असा सल्ला दिला. ही रुग्णवाहिका ही जनतेच्या आरोग्याची व बशीर हजवानी यांच्या दातृत्वाची चावी आहे असे तटकरेंनी सांगितले.

महापुराचे काळात मुस्लिम समाजाकडून कोणताही भेदभाव जात पात धर्म न पाहता जी मदत केली ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या सेक्युलॅरिझमचे प्रतिक आहे असे सांगत बशीर हजवानी यांच्या कार्याचा उचित गौरव राज्य सरकार कडून करण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात येईल असे तटकरे यांनी सांगितले.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळ, महापूर यासारख्या संकटाचे काळात सेवाभावी संस्थांनी शासकिय यंत्रणेच्या एक पाऊल पुढे राहून मदतकार्य केले त्यामुळे या संकटातून सर्व सामान्य जनता सावरू शकली. बशीर एम हजवानी फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थांचे कार्य हे शासकिय यंत्रणेपेक्षा महत्वाचे असून लोकप्रतिनिधींना अशा संस्थांचे काम प्रेरणादायी आहे असे सांगितले.

रुग्णाला हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा या रुग्णवाहिकेत उपलब्ध असल्याने त्यातून जाणारा रुग्ण बरा होऊन घरी परतेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपत्ती काळात एनडीआरएफची टिम पेक्षा जास्त मदतकार्य साळुंखे रेस्क्यु टिमकडून झाले असे गौरवोदगार त्यांनी काढले.
महाड येथे कायम स्वरूपी एनडीआरएफचा बेस कैम्प असावा याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला असून या बेस कॅम्पसाठी दुधडेअरीची ५ एकर जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. केंद्र सरकारचा प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब झाला तर राज्य सरकारच्या एचडीआरएफ चे पथक महाडकरांच्या मदतीसाठी तैनात असेल याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली.

आ. भरतशेठ गोगावले यांनी हजवानी फाऊंडेशनने दिलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून रुग्ण हॉस्पिटल पर्यत सुखरूप पोचेल असा विश्वास व्यक्त करून पडत्या काळात सहकार्य करणारा आपला खरा साथीदार असतो त्यामुळे बशीर हजवाने हे आपले खरे साथीदार असून त्यांना शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन गोगावले यांनी दिले.

सुरुवातीस अली कौचाली यांनी बशीर हजवानी यांचे समाजकार्याची ओळख करून दिली. मुस्लिम समाजासाठी महाडमध्ये सभागृह देण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींकडे केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.