एसीसी सिमेंट प्रकल्प बंद करण्याची नगरसेवक गोपाळ भगत यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली/ प्रतिनिधी
कळंबोलीमध्ये एसीसी सिमेंट प्रकल्प असून या प्रकल्पात शेकडो माथाडी कामगार काम करत आहेत . यातील अनेक कामगार कोरोना बाधित ( कोव्हिड -१९ ) आढळून आले आहेत. हे माथाडी कामगार कळंबोली व आसुडगावमध्ये राहत आहेत यांचा संसर्ग या गावातील ग्रामस्थांना होवून अनेकजणांचे जीव जावू शकतात तेव्हा अशी घटना घडण्यापुर्वी एसीसी सिमेंट प्रकल्प दोन महिन्यासाठी त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक गोपाळ भगत यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाने केली आहे.
पनवेलमध्ये कोरोनाने थैमान घालते असून दिवसेदिवस दिडशेच्या सरासरीने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पनवेलकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेकडून अनेक उपाययोजना करून सुद्धा कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. पालिका हद्दीतील कळंबोली येथे अनेक वेअरहाऊस प्रकल्प आहेत त्यात अनेक माथाडी कामगार काम करत आहेत. येथील एसीसी कंपनीचा सिमेंटचा प्रकल्प चालू असून त्यात शेकडो माथाडी कामगार व वाहनचालक काम करत आहेत. त्यातील अनेक जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. यातील बहुतेक कामगार कळंबोली व आसुडगावात वास्तव्यास आहेत. त्याच्या संसर्गातून गावपातळीवर कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावक-यांना कोरानाच्या साथीत लोटून त्यांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. तेव्हा कोरोनाने जीव घेण्यापेक्षा एसीसी सिमेंट प्रकल्प दोन महिन्यासाठी त्वरीत बंद करण्यात यावी व तसे आदेश देवून गावक-याचे प्राण वाचवावे अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गोपाळ भगत यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
Be First to Comment