शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांचा इशारा ; युनियनच्या आडमुठेपणामुळे अडकले कामगारांचे पैसे
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
तीन वर्षापुर्वी बंद पडलेल्या निटको कंपनीच्या कामगारांना अद्यापही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. लेबर कोर्टात कामगारांच्या बाजूने निर्णय लागूनही केवळ येथील कामगार युनियनच्या वरीसट पदाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे देण्यास दिरंगाई केली जात आहे. या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे.
कंपनी व्यवस्थापन कामगारांचे पैसे देण्यास तयार असताना युनियनचे पदाधिकारी कोणत्या कारणासाठी खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असा प्रश्न राजा केणी यांनी उपस्थितीत केला आहे. जोपर्यंत कष्टाचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत राजा केणी यांच्या नेतृत्वा खाली स्थानिक कामगारांच्या साधारण बाराशे कुटुंबियांनी रस्त्यावर उतरून लढा देण्याचाही निर्धार केला आहे.
अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील निटको कंपनीत साधारण 350 कामगार काम करीत होते. या सर्व कामगारांचे पैसे कंपनीने न दिल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रॅज्युएटीचे पैसे मिळावे यासाठी या कामगारांनी एक वर्षभर आंदोलन केले होते. त्यानंतर लेबर कोर्टात चाललेल्या दाव्यात कामगारांच्या बाजूने निकाल लागला. परंतु केवळ येथील कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. कंपनी व्यवस्थापन पैसे देण्यास तयार आहे; परंतु कामगार युनियनचे पदाधिकारी व्यवस्थापनाशी वाद घालत आहेत, असे म्हणणे कामगारांचे आहे. अखेर हा वाद अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांच्या दालनात आला आहे.
राजा केणी यांनी या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना राजा केणी यांनी सांगितले की, युनियनच्या पदाधिकाऱ्यांमुळे कामगारांवर अन्याय होत आहे. वर्षानुवर्ष काम केल्यानंतर हक्काचे पैसे देण्यास युनियन असमर्थ ठरत असेल, तर ते फार चुकीचे आहे. यात अनेक स्थानिक कामगार आहेत. या साडेतीनशे कामगारांवर उपजिविका करणाऱ्या साधारण बाराशे कुटुंबियांचे जगणेही कठिण झाले आहे. कंपनी बंद झाल्यानंतर या कामगारांना अद्याप कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर ग्रॅज्युएटीच्या पैसांसह इतर हिशोबही देण्यात आलेला नाही. ही अन्याय करणारी बाब असून यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल, असाही इशारा राजा केणी यांनी दिला आहे.








Be First to Comment