नामाप्र उमेदवार सर्वसाधारण प्रभागामधून लढणार ; नामाप्र मतदार मत देणार-फक्त नामाप्र प्रभाग अलिप्त
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नामाप्र आरक्षणाला स्थगिती आदेशानंतर पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रियेतून नामाप्र आरक्षित प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येऊन 2, 8, 10 आणि 14 या चार प्रभागांतील सुमारे चौदा नामाप्र उमेदवार रिंगणाबाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित 13 प्रभागांमधील निवडणुकांमध्ये सर्वसाधारण प्रभागांतून काही ठिकाणी नामाप्र उमेदवार निवडणूक लढवित आहेत आणि या सर्व 13 प्रभागांतील नामाप्र मतदारदेखील मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुक आयोगाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षित प्रभागांतील निवडणुका रद्द केल्याने प्रभाग 2 मध्ये कल्पेश मोहिते, मनोज प्रजापती, सुरेश पवार, लहू पवार आणि संभाजी माने तसेच प्रभाग 8 मध्ये रिमा बुरूणकर आणि अनिता जांभळेकर, प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण, संगिता इंगवले, प्रज्ञा सुर्वे, सायली सलागरे, प्रभाग 14 मध्ये निलेश सुतार, अंकिता जांभळेकर आणि प्रकाश भुतकर आदी 14 नामाप्र उमेदवारांचे अर्ज वैध ठरूनही ते सर्व रिंगणाबाहेर गेले आहेत.
याच चार प्रभागांतील मतदारदेखील मतदानाचे कर्तव्य बजाविण्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहेत. प्रभाग 2 मध्ये 194 महिला आणि 186 पुरूष असे 380 मतदार, प्रभाग 8 मध्ये 175 पुरूष आणि 174 महिला असे 349 मतदार, प्रभाग 10 मध्ये 143 पुरूष आणि 144 महिला असे 287 मतदार आणि प्रभाग 14 मधील 65 पुरूष आणि 71 महिला असे 136 मतदार वंचित राहणार आहेत. या चार प्रभागातील एकूण 569 पुरूष आणि 583 महिला असे 1 हजार 152 मतदार या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 14 उमेदवारांप्रमाणेच अलिप्त ठेवले जाणार आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील सर्वसाधारण आरक्षणाच्या प्रभागातून शिवसेनेकडून नागेश पवार, सुरेश पवार, रिमा बुरूणकर, मनसेतर्फे प्रज्ञा सुर्वे, काँग्रेसतर्फे श्रावणी शहा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित खेडेकर, भाजपकडून रश्मी दिक्षित हे इतर मागासवर्गीय जातींचे उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी लढवित आहेत. पोलादपूर नगरपंचायतीची एकूण मतदार संख्या 4 हजार 799 असून यामध्ये एकूण 2300 पुरूष आणि 2499 महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग 1 मध्ये 229 पुरूष आणि 142 महिला असे सर्वाधिक 471 मतदार आहेत. प्रभाग 3 मध्ये 102 पुरूष आणि 125 महिला असे 227 मतदार आहेत. प्रभाग 4 मध्ये 191 पुरूष आणि 261 महिला असे 471 मतदार आहेत. प्रभाग 5 मध्ये 136 पुरूष आणि 156 महिला असे 292 मतदार आहेत. प्रभाग 6 मध्ये 120 पुरूष आणि 125 महिला असे 245 मतदार आहेत. प्रभाग 7 मध्ये 172 पुरूष आणि 182 महिला असे 354 मतदार आहेत. प्रभाग 9 मध्ये 121 पुरूष आणि 120 महिला असे 241 मतदार आहेत. प्रभाग 11 मध्ये 140 पुरूष आणि 154 महिला असे 294 मतदार आहेत. प्रभाग 12 मध्ये 95 पुरूष आणि 93 महिला असे 188 मतदार आहेत. प्रभाग 13 मध्ये 118 पुरूष आणि 128 महिला असे 246 मतदार आहेत. प्रभाग 15 मध्ये 136 पुरूष आणि 153 महिला असे 289 मतदार आहेत. प्रभाग 16 मध्ये 55 पुरूष आणि 67 महिला असे 122 मतदार आहेत. प्रभाग 17 मध्ये 116 पुरूष आणि 110 महिला असे 226 मतदार आहेत.
यावेळी पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील 1 हजार 731 पुरूष आणि 1 हजार 960 महिला असे एकूण 3 हजार 691 मतदार नामाप्र आरक्षणाखेरिजच्या प्रभागात मतदान करू शकणार आहेत. पोलादपूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण प्रभागांमध्ये तसेच अनुसुचित जाती आरक्षण प्रभागामध्ये निवडणुक होत असून केवळ नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रिंगणाबाहेर जावे लागत असल्याने या पंचवार्षिक निवडणुकीचे स्वरूप सार्वत्रिक न राहता पोटनिवडणुकीप्रमाणे झाले आहे.
दरम्यान, पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात आघाडी झाली असूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत कोणताही दगाफटका होऊ मागीलवेळी काँग्रेस, शेकापक्ष व मनसे आघाडीतील शेकापक्षाच्या उमेदवाराने परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उमेश सुतार बिनविरोध निवडून आले होते; त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी 13 डिसेंबरपर्यंत काँग्रेसकडून प्रभाग 5,13,15 आणि 16 मधील उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची सावध खेळी खेळण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाची भुमिका सर्वच प्रभागात निर्णायक ठरणार असून शिवसेनेला याचा फटका बसेल अथवा काँग्रेसला याबाबत येणाऱ्या मतदानाचा कौलच ठरविणार असून मनसेकडूनही कोणाची पाठराखण केली जाईल, हे अद्याप निश्चित चित्र स्पष्ट दिसून येत नाही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध विजयी होण्याची शक्यता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने रखडली असून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांना पाच वर्षाचा कार्यकाळ विभागून देण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेतील नाराज उमेदवारांनी अन्य पक्षांतून उमेदवारी मिळविण्याचे टाळून पहिल्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराची तयारी दर्शविली आहे.








Be First to Comment