काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि अभासेनेचे उमेदवार रिंगणात : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे सर्वाधिक 10 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षातर्फे 6 उमेदवारी अर्ज, शिवसेनेतर्फे 2 तर अखिल भारतीय सेनेतर्फे 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने अंतिम मुदत उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणुक निर्वाचन अधिकारी तथा मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली. सोमवारी एकही अर्ज दाखल न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेसची आघाडी झाल्याने काँग्रेसचे आव्हान अधिकच वाढले आहे.

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊनही फारसा उत्साह दिसून आला नसताना शेवटच्या दोन दिवशी इच्छुकांनी तसेच अधिकृत उमेदवारी जाहिर झालेल्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात केली.
काँग्रेस पक्षातर्फे महाडच्या नगराध्यक्षा तथा प्रदेश सचिव स्नेहल जगताप, जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, निरिक्षक बरगे, तालुका अध्यक्ष अजय सलागरे, उपसभापती शैलेश सलागरे, युवक अध्यक्ष राजेश महाडीक, ऍड.सचिन गायकवाड, शहरअध्यक्ष अमोल भुवड आदींच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात झाली. यामध्ये प्रभाग 17 मधून दिलीप भागवत, 11 मधून स्वप्नील भुवड, 9 मधून तेजश्री अभिषेक गरुड आणि शर्मिला सचिन दुदुस्कर, 8 मधून अस्मिता राजन जांभळेकर, प्रभाग 3 मधून निखिल पांडुरंग कापडेकर, 4 मधून प्रतिक्षा प्रमोद शिंदे, 5 मधून अर्पणा अमित कदम, प्रभाग 14 मधून प्रकाश लक्ष्मण भुतकर आणि प्रभाग 2 मधून कल्पेश सुखलाल मोहिते आदी 10 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.

शिवसेनेकडून प्रभाग 1 मधून माजी नगराध्यक्षा सुनीता ज्ञानदेव पार्टे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर अस्मिता उमेश पवार यांनी प्रभाग 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे तालुका अध्यक्ष प्रसन्ना दगडू पालांडे यांनी प्रभाग 13 मधून, शीला पंकज बुटाला प्रभाग 4 मधून, रश्मी राजा दिक्षित प्रभाग 6 मधून, अंकिता अरविंद जांभळेकर यांनी प्रभाग 14 मधून तर एकनाथ नारायण कासुर्डे यांनी प्रभाग 15 मधून तर निलेश विजय आंबेतकर यांनी प्रभाग 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रथमच महेंद्र श्रीपती जाधव या उमेदवाराने प्रभाग 13मधून डॅडी अरूण गवळी प्रणित अखिल भारतीय सेनेतर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामुळे नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पारंपरिक काँग्रेस व शिवसेना या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांखेरिज राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष असे पाच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात दिसून येणार आहेत.








Be First to Comment