Press "Enter" to skip to content

खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

“माझा कचरा माझी जबाबदारी” ही संकल्पना केल्यास गाव-परिसर कचरा मुक्त होईल – डॉ.मेधा ताडपत्रीकर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

प्लास्टिक हे वाईट नसते,पण त्याचा किती वापर केला पाहिजे, हे लक्षात आले पाहिजे,नवीन शोधात माणसाने निसर्गाची हानी केली असून निसर्गाने दिलेल्या संपत्तीचे जतन करणे आवश्यक आहे, घनकचरा व्यवस्थापन बरोबरच प्लास्टिक संकलन करणे अतिशय उपयुक्त ठरते आहे.असे आवाहन प्लास्टिक योद्धा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांनी केले आहे.

स्वच्छता, पर्यावरण राखण्यासाठी शासनाने घनकचरा व्यवस्थापन,प्लास्टिक निर्मुलन याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी याबाबत सक्रिय असून घनकचरा व्यवस्थापन, वर्गीकरण,प्लास्टिक पासून मुक्ती यासाठी सातत्याने पाठपुरावा करताना दिसतात. ज्या ज्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन केंद्र निर्माण झाली आहेत,तेथे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, स्वच्छता अभियान राबविण्यात यशस्वी झालेले कर्मचारी,स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी यांचा केलेला अभ्यासदौरा या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यशाळा खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. मेधा ताडपत्रीकर बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, सर्वात जास्त कचरा हा आपल्या दैनंदिन जीवनातील घरात व भाजीपाला, शिल्लक अन्न यातून होतो,त्यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न बनवू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.प्लास्टिकची चिंता जगाला राहिली आहे, त्यामुळे प्लास्टिकची आवरणे,पिशव्या यांची सवय कमी करून कापडी पिशव्या वापराव्यात.प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे.प्लास्टिक बनविण्याची प्रक्रिया उलटी सुरू केल्यावर इंधन निर्मिती होते आणि तेही प्रदूषण मुक्त.या इंधनाचा वापर होतो, त्याचप्रमाणे प्लास्टिक रस्ते करण्यासाठी ही वापर होतो.नीती आयोगाच्या कॉफी टेबल बुकमध्ये त्यांची निवड झाली असून डिस्कव्हरी या जागतिक टीव्ही वाहिनीने त्यांच्या प्लास्टिक मुक्त कामाची दखल घेतली आहे.गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी ग्रामपंचायत यांच्या मार्फत सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले असून या उपक्रमासाठी आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले.

या कार्यशाळेस सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील,विस्तार अधिकारी शैलेश तांडेल,एम.जी.शिंदे, शिक्षण अधिकारी रेखा खेडेकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, स्वच्छता अभियान अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.