स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विधानपरिषद मतदार संघातील विरोधी पक्षाला मतदान करण्यासाठी नगरसेवक होण्याची धडपड ?
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची उमेदवारी निश्चिती करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असताना नगरसेवक होऊन काय करणार ? याची उत्तरे जरी शहराचा विकास वगैरे संभाव्य उमेदवारांकडून दिली जात असली तरी ज्यांच्याविरोधात जंगजंग पछाडलं जातं;त्याच पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विधानपरिषद मतदार संघातील उमेदवाराला बक्कळ मोबदला घेऊन मतदान करण्यासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील 2 जिल्हा परिषद सदस्य, 1 पंचायत समिती सभापती तसेच 17 नगरसेवकांसोबत 2 स्विकृत नगरसेवक असे 19 नगरसेवक अशा 22 जणांना विधानपरिषदेच्या कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असतो. यापुर्वीची स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषदेची कोकण विभागीय निवडणूक 21 मे 2018 रोजी पार पडली असून सहा वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या विधानपरिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना 620 मते पडली होती तर शिवसेनेचे ऍड.राजीव साबळे यांना 306 मते पडून साबळे यांचा 314 मतांनी पराभव झाला होता.
पोलादपूर तालुक्यातून शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवक मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना मतदान केल्याची आणि शिवसेनेचे उमेदवार साबळे यांच्या माध्यमातून गोवा पर्यटन केल्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची मते 15 मते असताना एकही मत ऍड.राजीव साबळे यांना पडले नसल्यानेच या मतांची जबाबदारी कोणी घेतली होती, याबाबत आजही उघड चर्चा होत आहे.
यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आव्हानात्मक भाषा करून खासदार गीते यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीमध्येही उघडपणे जाऊन पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुन्हा याच मतांच्या नेत्याने स्वत:च्या मर्जीतील उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न चालविला असून कट्टर शिवसैनिकांना निवडणुकीमध्ये कोणतेही स्वारस्य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. या राजकीय सामंजस्याच्या व तडजोडीच्या भुमिकेमुळे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारास काँग्रेसची मते मिळाली तर अन्यत्र शिवसेनेच्या मतांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यावर काँग्रेसची उमेदवारी नेत्याच्या गावची असल्याचे उघड झाले आहे.
याउलट, काँग्रेस, भाजपा आणि मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वबळावर लढताना एकमेकांना विचारात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे एकला चलो रे यामध्ये दोन अंतर्गत गटांचा प्रभाव दिसून येत असून यामध्ये डावलण्याचे आणि मर्जीतील लोकांनाच उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेला आघाडीची संधी असताना याच आघाडीमुळे शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागण्याचा धोकाही निर्माण होणार आहे.
पोलादपूर शहरातील मतदार जर आधी ग्रामपंचायतीच्या आणि नंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक सदस्यसंख्या निवडून देत असतील तर त्याआधी याच पोलादपूरकरांनी शिवसेनेचे फक्त दोन सदस्य निवडून प्रचंड बहुमताच्या काँग्रेससमोर दिल्याचीही वस्तुस्थिती असल्याने यंदा पोलादपूरकरांच्या मनात काय आहे, याचा अंदाज घेताना सर्वच राजकीय पक्षांना शहरविकासासाठी योग्य उमेदवार देण्याची गरज व्यक्त होत आहे.








Be First to Comment