Press "Enter" to skip to content

कापडे बुद्रुक येथील अपघातातील बालक कोमात

विनापरवाना विनाविमा मोटारसायकलस्वाराने दिली होती धडक

उपचाराच्या खर्चासाठी दानशूरांना मदतीचे आवाहन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

सोमवार, दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर सायंकाळी भरधाव मोटारसायकल चालविणाऱ्या तरूणाच्या बेपर्वाईमुळे एका बालकास धडक बसून तो गंभीर जखमी झाला. विनापरवाना विना इंश्युरन्स वाहन चालविणाऱ्या या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, जखमी बालक आर्यन सुनील कंक याच्या मेंदूला मार बसल्याने तो कोमात गेल्याने पालकांवर आर्यनवरील उपचारासाठी आर्थिक आवाहन करण्याची वेळ आली आहे.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील कंक कार वॉशिंग ऍण्ड सर्व्हिस सेंटरच्या समोर कृष्णा दादा गोळे वय 26 रा.मुगांव, चिखली, ता. वाई, जि.सातारा या तरूणाने सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने एमएच 11 सीबी 9251 ही भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दूर्लक्ष करून चालविली. यावेळी आर्यन सुनील कंक, रा.रानवडी, ता. पोलादपूर हा 12 वर्षाचा बालक रस्ता ओलांडत असताना त्यास मोटारसायकलीने धडक देऊन गंभीर स्वरूपाची इजा करण्यास कारणीभूत ठरला आहे.

अपघात करणाऱ्या वाहनाचा विमा नसल्याने तसेच वाहनचालकाकडे वाहनचालक परवाना नसल्याने जखमी आर्यनवरील उपचारासाठी कोणतीही मदत होऊ शकली नाही. त्यामुळे ठाणे येथील क्रिटीकेअर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून आर्यनच्या उपचारासाठी गेल्या पाच दिवसांत तब्बल दोन लाखांचा खर्च त्याचे वडील सुनील शिवराम कंक यांनी सोसला आहे. आर्यनच्या उपचारासाठी तसेच ब्रेन सर्जरीसाठी अंदाजे सात लाख रूपयांचा खर्च होण्याची शक्यता असताना त्याचे वडील व कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे त्यांच्यावर मुलाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्याची वेळ ओढावली आहे.

जखमी आर्यनच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत देण्यासाठी गुगल पे क्रमांक 9321989702 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया वाकण ता.पोलादपूर या शाखेच्या सुनील शिवराम कंक बॅक अकाऊंट नंबर 39867815089 आणि आयएफआयसी कोड एसबीआयएन 0007794 असा आहे. जखमी आर्यनवरील उपचारासाठी अधिकाधिक आर्थिक मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्याचे वडील सुनील कंक यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.