Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये ड्रोन सर्वेक्षणाची तमनाथमधून सुरुवात

कर्जत तालुक्यातील 336 गावांतील गावठाण जमिनीची होणार मोजणी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील सर्व गावांतील गावठाण क्षेत्रातील घरे, रस्ते व नाले यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडिया, भुमिअभिलेख कर्जत, महसूल व वन विभाग कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 336 गावांतील गावठाण जमिनींच्या ड्रोन सर्व्हेक्षणाची सुरुवात शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ येथून आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. या महत्वपूर्ण ड्रोन सर्व्हेक्षणानंतर ग्रामीण भागातील घरमालकांना आपल्या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून असल्याने अनेक प्रकारचा शासकीय लाभ भविष्यात स्थानिक व ग्रामीण भागातील नागरीकांना मिळणार असल्याने नागरीकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्रात असलेल्या मिळकतींचे संरक्षण करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून स्थानिक पातळीवर भुमिअभिलेख, महसूल व वन विभाग संयुक्तपणे हि जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहे. नुकताच तमनाथ येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करुन या नाविन्यपूर्ण अभियानाची सुरुवात शासकीय पातळीवरुन करण्यात आली आहे.

त्याप्रसंगी कर्जत तहसीलचे तहसीलदार विक्रम देशमुख,भूमिअभिलेख उप अधिक्षक इंद्रसेन लांडे, विधानसभा संघटक संतोष भोईर, सरपंच आरती संदीप भोईर, उप उपसरपंच रविंद्र भोईर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, नगरसेवक संकेत भासे, उद्योजक संदीप भोईर, रमेश कदम, नारायण पायगुडे, रमेश लोभी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग, महसूल व वन विभाग आणि भूमी अभिलेख यांच्या माध्यमातून हे ड्रोन सर्वेक्षण सुरु झाले आहे. यामधून गावठाण क्षेत्र निश्चित करण्यासाठी संपूर्ण राज्यात हे नाविन्यपूर्ण अभिमान सुरु आहे. त्याची सुरुवात नुकतीच कर्जतमध्ये ही करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून कर्जत तालुक्यातील 336 गावांतील गावठाण जमिनींची मोजणी केली जाणार आहे. हे ड्रोन सर्व्हेक्षण करताना एकदा ड्रोनने आकाशात झेप घेतली की, एकाच वेळी पाच गावांचे सर्वेक्षण करण्याची किमया अवघ्या काही मिनिटात या ड्रोनच्या माध्यमातून सफल होत असल्याने वेळेची व मनुष्यबळाची मोठी बचत होत आहे.

ड्रोन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्राची मोजणी शासकीय स्थरावरुन अत्यंत कमी कालावधीत अद्ययावत अशा यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने वेळ व मनुष्यबळाची मोठी बचत होत आहे. तर, या सर्व्हेक्षणामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून त्याचा फायदा भविष्यात विविध प्रकारच्या शासकीय कामांसाठी होणार आहे
– महेंद्र थोरवे
आमदार, कर्जत विधानसभा मतदार संघ

यापुढे ड्रोन सर्व्हेक्षणानुसार गावठाण क्षेत्राची मोजणी निश्चित होणार असल्याने त्याबाबत शासनाकडून नोंदवही अद्ययावत होणार आहे. संगणकीय प्रणालीवर भविष्यात नकाशे निश्चित करण्यासाठी ड्रोन ने केले जाणारे गावठाण सर्वेक्षण सर्वांसाठी फायद्याचे व महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नागरीकांनी या नाविन्यपूर्ण अभियानाला सहकार्य केल्यास हे महत्त्वाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल
– विक्रम देशमुख
तहसीलदार, कर्जत तहसील कार्यालय

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.