Press "Enter" to skip to content

चरई ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे उद्घाटन

शिवसेनेने कोटीकोटी रूपयांची विकासकामे करायची अन् पाच दहा लाख खर्च टाकणाऱ्यांची टीमकी वाजवायची हे बंद करा – आ.भरतशेठ गोगावले

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील अनेक रस्ते राज्यसरकारकडे वर्ग करून त्यासाठी कोटयवधी रूपयांचा निधी आणायचे काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करीत असताना जनतेतील काहींनी पाच-दहा लाख रूपयांची कामे करणाऱ्यांची टीमकी वाजवायची, हा दिशाभूल करण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे. चरई ग्रामपंचायतीप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तसेच पोलादपूरची नगरपंचायत या माध्यमातून शिवसेनेने केलेल्या विकासकामांबाबत आपले प्रेम व्यक्त करा, असे आवाहन महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या चरई प्राथमिक शाळा येथे केले.

पोलादपूर शहरानजिकच्या चरई ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी आ.गोगावले बोलत होते. याप्रसंगी आ.गोगावले यांच्यासोबत व्यासपिठावर राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, गटविकास अधिकारी जगताप, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, माजी राजिप महिला बालकल्याण सभापती संगिता कासार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुर्वे, स्थानिक सरपंच अनिता साळवी, उपसरपंच सुशांत कदम, निलेश कंक तसेच विविध प्रभागातील ग्रामस्थ महिला आदी उपस्थित होते.

आ.गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांवेळी मतदारांनी सहकार्य केल्यास आम्ही पाचही वर्षे आपणास सहकार्य करणार आहोत, अशी ग्वाही दिली.

आ.भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते चरई गावदेवी मंदिराकडे जाणारा रस्त्याचे भुमिपूजन, बौध्दवाडीतील सामाजिक सभागृहाचे उदघाटन आणि चरई प्राथमिक शाळा ते रानवडी रस्त्याचे भुमिपूजन असे कार्यक्रम करण्यात आले.

याप्रसंगी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, पोलादपूर तालुक्यातील सुमारे दहा महत्वाचे रस्ते आम्ही गेल्या वर्षभरात रायगड जिल्हा परिषदेकडून राज्यसरकारकडे वर्ग केले असून चरई ते रानवडीच्या रस्त्यासाठी एमआयडीसीतून आ.गोगावले यांच्या माध्यमातून निधी प्राप्त केला आहे, अशी माहिती दिली.

चरई ग्रामस्थांनी आ.गोगावले यांच्या दौऱ्याप्रसंगी भरपावसातही वाट पाहून गावदेवीच्या मंदिरामध्ये आमदारांच्या यशासाठी साकडे घातले असताना आ.गोगावले यांनी जनतेच्या मनात जे काय असेल ते होऊ दे, असे साकडे मानाई, जननी, काळकाई, चेडा या ग्रामदैवतांना घातले. याप्रसंगी मुख्याध्यापक शाम लवंगारे, ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे, देवस्थानचे अध्यक्ष, ग्रामस्थ किसन कुर्डे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.