Press "Enter" to skip to content

उरण नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार

जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक ; उरणमध्ये 3 नगरसेवक वाढणार

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू‌ |

राज्यातील ज्या नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. त्यामध्ये उरण नगरपालिकेचा ही समावेश आहे. उरण नगरपालिकेत सध्या नगरसेवक 17 व नगराध्यक्ष 1 असे एकूण 18 सदस्य आहेत. त्यामध्ये यावेळी 3 नगरसेवकांची वाढ होऊन एकूण नगरसेवक सदस्य 21 असणार आहे. तसेच सदर निवडणूक आरक्षणा नुसार प्रभागामध्ये 2 नगरसेवक तर एका प्रभागात 3 नगरसेवक असे 21 नगरसेवक निवडून द्यावयाचे असल्याची माहिती उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.

मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका होऊन नवीन बॉडी ही फेब्रुवारी महिन्यात बसने आवश्यक आहे. त्यामुळे सदर नगरपालिका निवडणूक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता अधिकृत सूत्राकडून वर्तवली जात आहे. परंतु राज्यात कोरोनाचे संकट येऊ घातल्याने निवडणूक होते की पुढे ढकलली जाते याची शाश्‍वती नाही.

उरण नगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही सर्वच पक्ष सुस्त असल्याचे दिसते. त्यांच्या छुपी रणनीती सुरू असल्याचे समजते. परंतु उरणकरांना भेडसावणार्‍या समस्यां बाबत सत्ताधारी अथवा विरोधक ही काही ठोस उपाययोजना करीत नसल्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मतदारांना आर्थिक रसद पुरविली की मते मिळतात असा राजकीय नेत्यांना विश्‍वास वाटत असल्यानेच ते मतदारांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. परंतु याबाबत कोणीच काही विरोध करताना अथवा मोर्चे, निदर्शने करताना दिसत नाहीत. सत्ताधारी मात्र आपण विकास केला असल्याचा दावा करीत आहे. तरीही शहरातील जनतेला समस्यांचा सामना का करावा लागतो असा सवाल उपस्थित होत आहे.

नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक ही जनतेच्या प्रश्‍नाबाबत ठोस आवाज उठवताना अथवा रस्त्यावर उतरतांना दिसली नाहीत. पत्रकाबाजी केली परंतु त्यातील किती समस्यांचा त्यांनी पाठपुरावा केला हे गुलदस्त्यात आहे. आता तर महाविकास आघाडीमार्फत नगरपालिका निवडणूक लढवून सत्तांतर करू असे सांगितले जात असताना या महाविकास आघाडीत तरी एकसूत्रीपणा आजतागायत दिसत नाही. उलट ते स्वबळाची वल्गना करून सत्ताधार्‍यांनाच पुन्हा सत्ता आंदाण करण्याचा तर डाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शहरातील समस्यांची सोडवणूक करण्याची जाण राजकीय पक्षांना असती तर अनेक समस्या मार्गी लागल्या असत्या, मात्र उलट समस्यां वाढत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याबाबत कोणीच ठोस उपाययोजना अथवा रस्त्यावर उतरताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी मतदारांना आमिषे दाखवून किंवा आर्थिक रसद पुरवून निवडणूक जिंकता येते असे राजकीय नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते शहरातील समस्यांकडे लक्ष देत नसावेत. तरी मतदारांनी या निवडणुकीत आपल्या समस्यां कोणता उमेदवार सोडवेल त्यालाच मतदान करून निवडून देने आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा पाच वर्षे समस्यांचा सामना करण्याशिवाय गत्यंतर नसणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.