सिटी बेल | मुरूड-जंजिरा | अमूलकुमार जैन |
मुरुडमधील एसटी कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम असून दिवसेंदिवस संप चिघळत चालला आहे. दरम्यान प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असल्याने एसटी आगारातून बस सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी आगार प्रमुख सनील वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
आगारप्रमुखांनी सांगितले कि, शुक्रवारी पेण येथील विभागीय अधिकारी यांनी मुरुडमध्ये येऊन संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची समजूत घालून त्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले तसेच येथील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून उर्वरित कर्मचारी त्वरित कामावर हजर न झाल्यास त्यातील २८ ते ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. संपातील एक वाहक कामावर हजर झाल्याने सोमवारी पेण येथील आगारातून एक चालक मागवून महिन्याभरानंतर सकाळी मुरुड-अलिबाग एसटी संरक्षणात पाठवण्यात आली.
सदर एसटीचे स्वागत आझाद चौक येथे मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, इर्शाद कादरी, गोंडेकर इत्यादींनी चालक डी .ए. म्हसकर व वाहक प्रकाश दांडेकर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार व्यक्त करून केले.
महिनाभराने लाल परीचे दर्शन घडल्यानंतर प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सध्या मुरुड आगारात एकच वाहक असून चालक उपलब्ध नाहीत. संप मिटेपर्यंत पेण, रोहा इत्यादी आगारातून चालक वाहक उपलब्ध झाल्यास आम्ही एसटीच्या फेऱ्या वाढवून सेवा सुरळीत करून प्रवाशांची गैरसोय टाळू असे आगारप्रमुख सनील वाकचौरे यांनी सांगितले.








Be First to Comment