आपल्या विकासासाठी प्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे
— कपिल पाटील, केंद्रीय मंत्री
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
‘आपण म्हणतो शेतीमध्ये काय आहे ? नेहमी तोटाच होतो अशी आपला समज आहे. कोणतेही काम करताना उत्तम व्यवस्थापन हवे असते. आपल्या विकासासाठी प्रथम आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. पूर्वी खेडे गावातून शहराकडे दूध जात होते पण आता काळ बदलला आहे. शहरात म्हशी नसताना तेथून दूध अगदी ग्रामीण भागात पोहोचते. आता पुन्हा ग्रामीण भागातील परिस्थिती बदलण्यासारखी निर्माण करावी लागेल. नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. 1977 साली इंदिराजींनी आणीबाणी आणली त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागून कृषी कायदा मागे घेतला परंतु देशाला झुकू दिले नाही.’ असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी येथे केले.
भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा कोंकण विभागाच्या वतीने पंचायत राज संवाद समारंभाचे आयोजन विठ्ठल नगर मधील सुनिल गोगटे यांच्या भाजपा कार्यालयात करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर,किरण ठाकरे, सुभाष घरत, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,आकाश चौधरी, आरपीआय तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, भाजपा शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, शहर अध्यक्षा सरस्वती चौधरी, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामीनी मांजरे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, प्रकाश पालकर, कल्पना दास्ताने आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
किसान मोर्चा कोंकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात समारंभाचा उद्देश सांगितला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात, ‘निवडणुकीच्या वेळी राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 60 हजार रुपये टाकू असे सांगितले होते. तर नरेंद्र मोदी यांनी आम्ही 6 हजार रुपये देऊ असे सांगितले होते. मात्र जनतेने मोदींवर विश्वास दाखवला कारण मोदी बोलतात तसे करतात याची प्रचिती वेळो वेळी आली होती. उलट विरोधक लोक सहा रुपये तरी देतील काय? अशी शंका जनतेला हाती. म्हणून त्यांना पराभव पत्करावा लागला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशाची दखल जगभरात घेत आहेत. त्यांना अधिक साथ देण्याची गरज आहे. आपण अधिकार चांगले गाजवतो व कर्तव्यात कसूर करतो. आपण अधिकाराबरोबर कर्तव्य सुद्धा बजावली असती तर आपला भारत देश अधिक बलवान झाला असता,पेण अर्बन बँकेचा मोठा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.’ असे सांगितले.
वासुदेव काळे यांनी ‘शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या योजना असतात. त्या प्रत्येक राज्य सरकारने राबवायच्या असतात मात्र महाराष्ट्रात आपले सरकार नाही. त्यामुळे ते आपणच या योजना आणल्या आहेत असे सांगतात. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी हे जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे.’ असे सांगितले. परशुराम म्हसे यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना सांगितल्या. राहुल डाळिंबकर यांनी, ‘पेण बँकेचा प्रश्न महत्वाचा आहे. तो सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.’ असे सूचित केले. रमेश मुंढे यांनी, ‘आम्ही युतीतून इथला आमदार निवडून आणला परंतु त्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी, गोरगरीबांसाठी चांगले काम करीत आहेत. असे सांगितले. दीपक बेहरे यांनीही आपले विचार मांडले. चिंतामण पाटील यांनी पेण अर्बन बँकेची व्यथा मांडली. याप्रसंगी ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन नम्रता कांदळगावकर तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रम तब्बल चार तास उशिरा सुरू झाला तरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment