सरकारी हमीभाव भात खरेदी केंद्रात पावती पुस्तकेच मिळत नाही पैशांची हमी कोण घेणार ? — मारुती वाळंज यांचा सवाल
सिटी बेल | रोहा | शरद जाधव |
कोलाड-वरसगाव येथे सरकारी भात खरेदी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.परंतु केंद्रावर भात खरेदी केल्यानंतर शेतकरी वर्गाला देण्यात येणारी पावती पुस्तकेच येथील केंद्रावर उपलब्ध नसल्याने एकप्रकारे येथील केंद्रावर फसवणूकच होत असल्याची परखड प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मारूती वाळंज यांच्याकडे व्यक्त केली आहे.
या व्यवहारात एकप्रकारे शेतकरी वर्गाची मोठीच फसवणूक होत असून शेतकरी वर्गातून नाराजीही व्यक्त केली जाऊ लागली आहे. तर भात खरेदीघा व्यवहार हा साध्या पावतीवर होत असल्याने शेतकरी वर्गाच्या पैशाची हमी कोण घेणार असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, नैसर्गिक आपत्ती,शेतमालास योग्य भाव न मिळणे यामुळे शेती करणे सध्यातरी शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने शासन स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्यापैकीच सुरू करण्यात आलेले हमीभाव केंद्र एकप्रकारे शेतकरी वर्गाला दिलासादायक ठरत आहे. परंतू येथील हमीभाव केंद्रावर पावती पुस्तकच मिळत नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाला शासनाकडून निर्धारित वेळेत पावती पुस्तके मिळवून देऊन शेतकरी वर्गाला दिलासा मिळवून द्यावा अशाप्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून होऊ लागली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.








Be First to Comment