Press "Enter" to skip to content

अवघ्या चार तासात लावला अपहरण नाट्याचा छडा

मामा वरच्या रागापोटी भाचीनेचं केले मामाच्या मुलाचे अपहरण

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली खांदेश्वर पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी

सिटी बेल | पनवेल |

नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत खांदेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील विचुंबे गावातील विनय सिंग यांच्या सहा वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. सोबत त्यांची भाची देखील होती.23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या चार तासात अत्यंत उत्तम तपास कौशल्याचे प्रमाण देत आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या खमक्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या तपास अभियानाबद्दल त्यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन या तपास अभियानाबद्दल प्रसिद्धीमाध्यमांना अवगत केले.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, विचुंबे येथे राहणारे विनय गामा सिंग व त्यांच्या पत्नी पिंकी सिंग यांनी 23 तारखेच्या रात्री सहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पिंकी सिंग यांना त्यांच्या मोबाईल वरती एका अज्ञात इसमाने त्यांची भाची व त्यांचा मुलगा त्याच्या कब्जात असून दहा लाख रुपये दिले नाही तर त्यांना ठार मारू अशा स्वरुपाची धमकी पाठविली होती. विनय सिंग यांची 19 वर्षीय भाची मनीषा (गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून नाव बदलले आहे) ही गेले सहा दिवस तिच्या मामाकडे वास्तव्यास आलेली असून ती मेडिकल स्टोर मध्ये काही कामा निमित्त छोट्या भावाला घेऊन बाहेर पडली होती,त्यानंतर ते दोघेही परतले नाहीत. आरोपीने सदर धमकी एसएमएसच्या माध्यमातून दिली होती त्यामुळे खांदेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून तांत्रिक तपास करत असता असे निदर्शनास आले की धमकी देणारा आरोपी प्रथम छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे लोकेट झाला. त्यानंतर काही काळ त्याचा फोन स्विच ऑफ येऊ लागला, थोड्याच वेळात त्याचे लोकेशन बांद्रा खार असे दिसू लागले. देविदास सोनवणे यांनी तातडीने तीन टीम बनवून त्यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस, बांद्रा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाऊन तपास करण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त आणखीन एक टीम कल्याण येथे तातडीने त्यांनी रवाना केली. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होते कारण जर आरोपी बाहेर गावी जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसून मुंबईबाहेर गेला असता तर त्याला शोधणे खूपच जिकरीचे होते.

अखेरीस खांदेश्‍वर पोलीस टीमने बांद्रा येथे दोन्ही मुलांना शोधण्यात यश प्राप्त केले परंतु पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी मात्र पळून गेला. अपहरण झालेल्या दोन्ही मुलांच्या कडे चौकशी करता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अवघ्या दोन तासात विपिन हिरालाल अग्रहरी वय वर्षे एकवीस याला ताब्यात घेतले. आधीक चौकशीअंती एका क्लिष्ट अपहरण नाट्या वरचा पडदा उठला. तक्रारदार विनय सिंग यांच्या सहा वर्षीय मुलाचे अपहरण त्यांच्याच भाचीने केले होते. ह्या अपहरण नाट्याच्या पाठीमागची सूत्रधार त्यांची भाची मनीषा होती.विपिन हिरालाल अग्रहरी आणि मनिषा हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे वास्तव्यास असून सहा महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केले आहे. मनीषा च्या लग्नात तिच्या घरच्यांचा विरोध होता त्यात तिचा मामा विपिन सिंह यांचा प्रखर विरोध होता. मामाला आद्दल घडविण्याच्या उद्देशाने तिने तिच्या नवऱ्याबरोबर मिळून अपहरण नाट्य रचले होते. परंतु व पो नी देविदास सोनवणे यांच्या सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या पोलीस तपास अभियाना समोर त्यांचे हे अपहरण नाट्य अवघे चार तासच टिकू शकले.

मामाच्या मुलाचे अपहरण करणारी भाची आणि तिच्या नवऱ्याला घेऊन जाताना तपास अधिकारी

मनिषा आणि विपिन हिरालाल अग्रहरी यांना अटक करण्यात आले असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या तपास अभियानात पोलीस निरीक्षक, गुन्हे डी. डी. ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे. पोलीस उपनिरीक्षक निलेश पोळ, किरण वाघ, पोलीस हवालदार सुदर्शन सारंग,महेश कांबळे, विषाल घोसाळकर, चेतन घोरपडे, सचिन सरगर, संभाजी गाडे तर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी व पथक, तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे,जाधव व पथक, कळंबोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बच्छाव व पथक, गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे प्रवीण पाटील व पथक यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे करत आहेत. अत्यंत कमी वेळात संवेदनशील प्रकरणाचा तपास धडाडीने लावल्याबद्दल खांदेश्वर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांचे पनवेल परिसरात कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.