Press "Enter" to skip to content

पोलादपूर तालुक्यात 15 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका

पोलादपूर तालुक्यात काटेतळी व लोहारे ग्रामपंचायती वगळता नामनिर्देशन न आल्याने नामाप्र, अजा, अज पदे रिक्तच ठेवण्याची परंपरा

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठाबहुल ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या मराठाइतर समाजांच्या ग्रामपंचायत सदस्यपदांच्या जागा रिक्त ठेवण्याची अजब परंपरा अस्तित्वात असून संबंधित प्रवर्गाच्या समाजांचे अस्तित्व असूनही कागदपत्रांची जंत्री नाचविण्याकामी सर्वच राजकीय पक्ष अनुत्सूक असल्याने या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका जाहिर होऊनही प्रतिसाद मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे. 15 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून यापैकी केवळ काटेतळी आणि लोहारे या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजिनामा दिल्याने पद रिक्त झाले आहे तर अन्य ठिकाणी निवडणुकीपासूनच पदे रिक्त असल्याचे दिसून आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे 22 डिसेंबर 2017च्या निवडणुकीपासून नामाप्र महिलेचे पद प्रभाग 1 मध्ये रिक्त आहे. या ग्रामपंचायतीची मुदत 21 डिसेंबर 2022 पर्यंत असूनही गेली चार वर्षे या पदासाठी कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. यानंतर पांगळोली ग्रामपंचायतीमध्ये 2 जुलै 2018 पासून प्रभाग 1 मध्ये नामाप्र आणि प्रभाग 3 मध्ये नामाप्र महिला आणि अनुसुचित जाती अशी दोन पदे रिक्त असून 1 जुलै 2023 पर्यंत ग्रामपंचायतीची मुदत असून तीन सदस्यांविनाच कामकाज सुरू आहे. याच ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमानुसार झालेल्या महाळुंगे ग्रामपंचायतीमध्ये नामाप्र महिला प्रभाग 3मध्ये आणि महालगूर ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 2 मध्ये नामाप्र महिला आणि प्रभाग 1 मध्ये नामाप्र अशा दोन जागा रिक्त आहेत. पळचिल येथील प्रभाग 1 मध्ये नामाप्र, प्रभाग 2 मध्ये नामाप्र महिला आणि प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण महिला या जागा रिक्त आहेत. आडावळे बुद्रुक येथे प्रभाग 3 मध्ये अनुसुचित जाती महिला आणि प्रभाग 1 मध्ये नामाप्र महिला अशी दोन महिलांची पदे रिक्त आहेत. गोवेले येथे अनुसुचित जमाती पद प्रभाग 2 मध्ये रिक्त आहे. गोळेगणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये नामाप्र महिला पद रिक्त आहे. बोरघर प्रभाग 3 मध्ये अनुसुचित जमाती पद रिक्त आहे. पैठण प्रभाग 2 मध्ये अनुसुचित जमाती स्त्री पद तर उमरठ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये नामाप्र तर प्रभाग 3 मध्ये अनुसुचित जमाती आणि नामाप्र महिला अशी दोन पदे रिक्त आहेत. ओंबळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये नामाप्र महिला पद रिक्त आहे. देवपूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये अनुसुचित जमाती महिला आणि नामाप्र महिला अशी दोन महिला पदे रिक्त आहेत.

पोलादपूर तालुक्यातील काटेतळी ग्रामपंचायतीमध्ये राजिनामा दिल्याने प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण पद रिक्त आहे तर बहुचर्चित लोहारे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये शाळा समिती सभापती असलेल्या सदस्यांनी राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुक घेतली जाणार आहे.

या पोटनिवडणुकीमध्ये एकूण 10 नामाप्र महिला, 4 नामाप्र, सर्वसाधारण 2, सर्वसाधारण महिला 1, अनुसुचित जमाती 3, अनुसुचित जमाती महिला 2, अनुसुचित जाती 1, अनुसुचित जाती महिला 1 अशा 24 रिक्त पदांसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत असून आवश्यक असल्यास 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पोलादपूर तालुक्यात कोणत्याही राजकीय पक्षांना नामाप्र आणि अजा अज उमेदवारांच्या जातीचे आणि जातपडताळणीचे काम करण्याची इच्छा नसल्याने या जागा निवडणुक प्रक्रिया जाहिर झाल्यापासूनच रिक्त राहात असल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चुरस सर्वत्र दिसून येत असताना या मागास प्रवर्गासह अविकासित लोकसंख्येला आरक्षण मिळूनही ग्रामपंचायतीच्या कामकाजापासून वंचित राहावे लागत असल्यामागे या समाजाच्या उमेदवारांची जातविषयक कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे महत्वपूर्ण कारण दिसून येत आहे.

पोलादपूर तालुक्यात प्रगत समाजाकडून विविध राजकीय पक्षांचे नेतृत्व केले जात असताना मागास आणि अविकसित समाजाला सोबत घेऊन जाण्याची मानसिकता कोणत्याही राजकीय पक्षामध्ये दिसून येत नाही. काही ठिकाणी प्रगत समाजाने नामाप्र अथवा अनुसुचित जमाती प्रवर्गाला थेट सरपंच पदासाठी वंचित ठेवण्यासाठी अर्जदेखील सादर करण्यास मज्जाव केल्याचे दिसून आले आहे तर काही ठिकाणी प्रगत समाजाप्रमाणेच मागास समाजानेदेखील महिलांना कुठे राजकारणात उतरवायचे असते का? अशी मानसिकता बाळगून सदरची पदे रिक्त ठेवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या 15 ग्रामपंचायतीमध्ये 24 रिक्त पदांपैकी एक-दोन पदे वगळता अन्य सर्व पदे रिक्त राहण्याचीच दाट शक्यता दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.