Press "Enter" to skip to content

मार्च अखेरपर्यंत योजना पूर्ण करणार – अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

खारेपाटातील पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर शेकापचे धरणे आंदोलन

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मागील अनेक दशकांपासून पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसून आज पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात प्रामुख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागाच्या पाण्याची समस्या अनेक वर्षे सुटत नसल्याने त्यावेळचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये पेण ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात आला असता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी २९ कोटी ३८ लाख रुपये मंजूर करून सदर निधी एमजीपी ला सोपविण्यात आला त्यानुसार काम सुद्धा सुरू करण्यात आले होते.

मात्र योजनेचे काम ४ वर्षे पूर्ण होऊन देखील अपु-या अवस्थेत असल्याने आणि ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे या कामाला गती मिळत नसल्याने हे कामच ठप्प झाले होते. त्यामुळे हा प्रश्न असाच प्रलंबित राहिल्याने आजही हा भाग पाण्यापासून वंचितच राहिला असून यामुळे आता या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरावा यासाठी आज पुन्हा एकदा शेकापच माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हाजारों नागरिकांनी वाशी येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.मात्र काही तासानंतर जीवन प्राधिकरण कार्यालयाचे अधिकारी गजबीये यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सदर पाणीपुरवठा योजना येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून खारेपाट भागाला पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन दिले.

दरम्यान या कामाबाबत चार महिन्यातील आढावा घेण्यासाठी आंदोलकांची समिती तयार करून प्रत्येक महिनीच्या अखेरीस कामाची प्रगती समिती समोर माडण्यात यावी अशी मागणी करून सदर काम कुठं पर्यंत येत असल्याचे पाहण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत खारेपाटाला पाणी आले नाही तर येणाऱ्या काळात या पेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.यावेळी पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांना तो पर्यंत संपूर्ण खारेपाटातील जनतेला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली असता त्यानुसार सदर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे तहसिलदार त्यांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या सभापती अॅड.निलिमा पाटील, सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्‍हात्रे, माजी नगराध्यक्ष गुरूनाथ मांजरेकर, तालुका चिटणीस संजय डंगर, भाऊ ऐरणकर, माजी सभापती सौ. भोईर, स्मिता पेणकर, संदेश ठाकुर, स्वप्निल म्हात्रे, उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, सुनिल गायकर आदिंसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.