Press "Enter" to skip to content

परिस्थिती बदलतेय; पण विरोधकांचा बांध फुटला तर होईल पूर्ववत !

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या निवडणुकीत ‘मुळशी पॅटर्न’ चा प्रभाव

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसने मनसे आणि शेकापक्षासोबत आघाडी करून आव्हान निर्माण केले असताना ऐन मतदानाच्या दिवशीच रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्यासोबत उडालेल्या चकमकीने मतपरिवर्तन घडून मतदानाचा कौल शिवसेनेच्या बाजूने गेला. भाजपाच्या एकला चलो रे भुमिकेचा शिवसेनेच्या विरोधात एकवटलेल्या काँग्रेस, मनसे आणि शेकापक्ष आघाडीला लाभ होण्याऐवजी अचानक होणाऱ्या चकमकीने निकालच बदलला होता. या अचानक घडणाऱ्या घटनाने निकाल बदलण्यामागे काही तात्काळ प्रभावित होणाऱ्या मतदारांवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून आला असताना गेल्या वर्षी पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीची मुदत संपुष्टात आल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेला तीन कोटींचा विशेष विकास निधी प्राप्त झाल्यावर अनुकुलता निर्माण झाली होती. आता प्रशासकाच्या काळामध्ये सर्वच सत्ताधारी अन् विरोधक विस्मृतीत जाण्याने परिस्थितीत बदल होत आहे. मात्र, शिवसेनेमध्ये पाच वर्षांमध्ये पाच नगराध्यक्ष झाल्याने नगराध्यक्ष होण्यासाठी अन्य पक्षियांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी बांध फुटल्यास शिवसेनेचा गड पुन्हा भक्कम होऊ शकतो. मात्र, मुंबई गोवा महामार्गाच्या भुसंपादनाचा मोबदला घेतलेल्यांपैकी काही उमेदवारांमुळे पैशाचा मुळशी पॅटर्नदेखील काही प्रभागांमध्ये दिसून येणार आहे.

पोलादपूरच्या उत्तरेकडून प्रभाग रचनेचा निर्देश पाळून ही प्रभागरचना करण्यात आली आहे. प्रभाग 1 मध्ये पार्टेकोंड, सावंतकोंड,रामनगर या लोकवस्तीचा समावेश असून येथून शिवसेनेच्या सुनीता पार्टे या माजी नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत. येथे यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहिर झाले आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये हनुमाननगर, सावित्रीनगर व आंबेडकर नगर रस्त्याचा पूर्वेकडील भाग येथील लोकवस्ती असून येथून काँग्रेसच्या रेखा सोनावणे तिसऱ्यांदा निवडून आल्या. मात्र, येथे आता सर्वसाधारण पुरूष अथवा महिला उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाला इथे आव्हान निर्माण झाले आहे. येथे नव्या आरक्षणानुसार नागरिकांचा मागासप्रवर्गातील स्त्री अथवा पुरूष उभे राहू शकणार आहेत. प्रभाग क्र. 3 मध्ये रोहिदासनगर, भैरवनाथनगर उत्तरेकडील भाग व महिला सभागृह उत्तरेकडील भाग या लोकवस्तीत काँग्रेसच्या शुभांगी भुवड या तिरंगी लढतीत विजयी झाल्या. मागासवर्गीय प्रवर्ग महिला किंवा पुरूष उमेदवार येथे निवडणूक लढवू शकत असल्याने येथे काँग्रेसला आव्हान निर्माण झाले आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये भैरवनाथनगर उत्तरेकडील भाग, बाजारपेठ उत्तरेकडील भाग, गणपतीमंदिर ते जयंत विठ्ठल शेठ यांच्या घरापर्यंत व आनंदनगर रस्त्याच्या उत्तर पूर्वेकडील भाग अशी लोकवस्ती असून येथून शिवसेनेचे प्रसन्ना बुटाला तिरंगी लढतीत निवडून आले. सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित जागेमुळे या प्रभागातून मतदारांना प्रभावी महिला निवडून आणावी लागणार आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये प्रभातनगर पूर्व लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या कल्पना सवादकर विजयी झाल्या. मात्र, आता सर्वसाधारण महिला उमेदवारांमुळे येथे स्पर्धा वाढणार आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये प्रभातनगर पश्चिम व जाखमातानगर या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश पवार बिनविरोध विजयी झाले. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे येथे शिवसेनेसमोर भाजप तसेच शिवसेनेच्या नव्या उमेदवारांचे आव्हान उभे राहणार आहे. प्रभाग क्र. 7 गोकूळनगर रस्त्याच्या उत्तरेकडील सैनिकनगर रस्त्याच्या उत्तरेकडील लोकवस्तीमध्ये काँग्रेसचे सुभाष गायकवाड चौरंगी लढतीत विजयी झाले. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे येथे काँग्रेस पक्षाला आव्हानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्र. 8 सैनिकनगर दक्षिणेकडील आणि साईनाथनगर या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड हे तिरंगी लढतीत विजयी झाले. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार रिंगणात उभे राहू शकणार असल्याने महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. प्रभाग क्र. 9 मध्ये तांबडभुवन व गणेशनगर लोकवस्तीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी चव्हाण विजयी झाल्या. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे काँग्रेसचा वरचष्मा कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. येथे भाजपाचाही शिरकाव झाल्याने मतविभागणी अटळ आहे. प्रभाग क्र. 10 मध्ये मठगल्ली व वरचा मोहल्ला लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या संगिता इंगवले या तिरंगी लढतीत विजयी झाल्या. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला आरक्षणामुळे येथे शिवसेनेला पुन्हा संधी दिसून येत आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपानेही उमेदवारी केली तर शिवसेनेला मतांची कमतरता पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रभाग क्र. 11 आनंदनगर पूर्व लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या आयुषी पालकर या विजयी झाल्या. शिवसेनेला येथेही सर्वसाधारण आरक्षणामुळे संधी दिसून येत आहे. मात्र, येथे शिवसेनेविरोधात काँग्रेस मनसे आणि शेकापक्षाच्या आघाडीच्या महिला उमेदवारास पराभूत करताना काँग्रेसची मते शिवसेनेला गेल्याने यावेळी शिवसेनेची मते काँग्रेसला पडून गेल्या निवडणुकीतील वाटाघाटी सफल होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रभाग क्र. 12 मध्ये बाजारपेठ पश्चिमेकडील, शिरिष साबळे ते आनंदनगर रस्त्यापर्यंत मंगल प्रभाकर शेठ यांच्या दुकानापर्यंत व पूर्वेकडील बाजारपेठ, गंगामाता मंदिर ते शंकरमंदिर सिध्देश्वर आळी या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ हे तिरंगी लढतीत विजयी झाले. येथे सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे शिवसेनेसमोर महिला उमेदवारांची संख्या वाढण्याची समस्या दिसून येत आहे. प्रभाग क्र. 13 मध्ये शिवाजीनगर बाजारपेठ पूर्वेकडील आणि शिवाजीनगर बाजारपेठ पश्चिमेकडील लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे शेवटचे नगराध्यक्ष राजन पवार हे विजयी झाले. सर्वसाधारण आरक्षणामुळे या जागेसाठी शिवसेनेचा वरचष्मा कायम राहणार आहे.मात्र, तगडा आर्थिक कुवतीचा उमेदवार येथील निकाल बदलू शकणार आहे. प्रभाग क्र. 14 मध्ये मच्छीमार्केट शिवाजीनगर पूर्व ते कॅप्टन विक्रमराव मोरे हॉलपर्यंत लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक काळ पाणीपुरवठा सभापती असलेले माजी नगराध्यक्ष निलेश सुतार विजयी झाले. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणामुळे आता येथे शिवसेनेला अन्य महिला उमेदवार शोधावा लागणार आहे. प्रभाग क्र. 15 शिवाजीनगर प्रभाकर शेठ यांच्या दुकानापासून दिलीप साबळे यांच्या घरापर्यंत ते नाना नानी पार्कपर्यंत या लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या पहिल्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी विजयी झाल्या. सर्वसाधारण आरक्षणामुळे शिवसेनेमध्ये चुरस निर्माण झाली असून याठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे.

प्रभाग क्र. 16 मध्ये देवळे यांच्या प्लॉटपासून पोलीस वसाहत, मुंबई गोवा हायवेपर्यंत या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नागेश पवार हे दोन वेळा निवडून आले. पहिल्यावेळी विजयी झाल्यानंतर नागेश पवार काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते. सर्वसाधारण महिला किंवा पुरूष आरक्षणामुळे याठिकाणी पुन्हा नागेश पवार यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग क्र. 17 मध्ये गाडीतळ, आदिवासीवाडी आणि लेप्रसी मिशन हॉस्पिटल लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या सिद्दीका लोखंडे या विजयी झाल्या. मात्र, सर्वसाधारण महिला किंवा पुरूष जाहिर झाल्याने याठिकाणी शिवसेनेला प्रभाग राखण्यासाठी पुरूष उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

काँग्रेससोबत गेल्या निवडणुकीमध्ये राहिलेले शेकापक्ष व मनसे हे राजकीय पक्ष मागीलवेळी प्रभाग 11मध्ये काँग्रेस पक्षासोबत असूनही मनसे उमेदवार शिवसेना उमेदवाराकडून पराभूत झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकला चलो रे च्या मानसिकतेत तटस्थपणे कार्यरत राहतील. मागीलवेळी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार 7, 15 आणि 16 प्रभागांमधून उमेदवारी करूनही मनसे आणि भाजपाप्रमाणेच निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहिला.

पोलादपूर नगरपंचायतीच्या या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी कोरोना लॉकडाऊन काळात प्रशासकीय राजवट सुरू झाली असताना निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली होती. आता आरक्षण, मतदार याद्या तसेच राजकीय व्यूहरचना यांनी वेग प्राप्त केला असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील भुसंपादनाचा मोबदला घेतलेले उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवक यांचा या निवडणुकीमध्ये पैशांचा सुळसुळाट मोठया प्रमाणात दिसून येणार आहे. अन्य उमेदवारांचा खर्च राजकीय पक्षांनाच करावा लागणार असताना सध्या शिवसेनेला प्रतिकूल असलेले वातावरण शिवसेनेच्या अनेकांना नगराध्यक्षपद देण्याच्या फर्ॉम्युलामुळे अनेक नगराध्यक्ष होण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक तसेच माजी नगरसेवक यावेळी शिवसेनेसोबत तन-मन-धनाने निष्ठेने काम करताना दिसून येतील. यामुळेच विविध राजकीय पक्षांतील इच्छुक शिवसेनेमध्ये नजिकच्या काळात प्रवेश करून नगराध्यक्षपदासाठी प्रयत्नशील राहतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे राजकीय समांतर वाटचाल करीत असताना शिवसेनादेखील स्वतंत्रपणे वाटचाल करणार आहे. मात्र, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना नाईलाजाने यामुळे समांतरपणे वाटचाल आवश्यक ठरणार आहे. आरक्षण बदलले तरी प्रभागरचना कायम राहणार असल्याने मतदारांना त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले नगरसेवक बदलण्याचे भान राहते अथवा नगरसेवकाचा नगराध्यक्ष होताना आनंदाने पाहायचे आहे, यावरच 13 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मतदार धक्का देतील अथवा कसे, हे दिसून येईल. मात्र, दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे पोलादपूर शहराची पूर्व आणि पश्चिम अशी फाळणी झाली असताना सत्ताधारी नगरसेवकांसोबत विरोधक आणि प्रशासकदेखील असहाय्यतेने गप्प झाल्याने नागरिकांच्या समस्यांसोबत नागरिकरणाच्या समस्यांचाही विचार निवडणूक जाहिरनाम्यामध्ये दिसून आल्यास नागरिक कोणता झेंडा घेऊ हाती, हे स्वत:च ठरवून सत्ताबदल करू शकणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.