रिलायन्स नागोठणे कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल हि अपेक्षा : अॅड.प्रकाश आंबेडकर
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रिलायन्स नागोठणे कंपनीमध्ये आपल्याला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसह मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून प्रकल्पग्रस्त, रिलायन्स व्यवस्थापन आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती अॅड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यासंदर्भात रिलायन्स कडून सकारात्मक व अंतिम निर्णय होऊन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड: प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. रायगड जिल्हाधिकारी हे रिलायन्स व्यवस्थापनांशी बोलून 15 दिवसात प्रस्ताव मागवणार आहेत. 15 दिवसांनी पुन्हा बैठक बोलवली जाईल. चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा देखील अॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आज अॅड: प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी तसेच रिलायन्स कंपनीचे प्रशासन उपस्थित होते. बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मागील इतिवृत्तानुसार रिलायन्स प्रशासनाने देखील 206 प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले. याबाबत 15 दिवसांत रिलायन्स व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्त आणि जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव तयार करुन त्याप्रमाणे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात 15 दिवसांनी पुन्हा बैठक बोलवली जाणार असून तोपर्यंत जर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर मात्र प्रकल्पग्रस्त आपले आंदोलन आणखी उग्र करतील असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना अॅड प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या धरपकडीबाबत पत्रकारांना माहिती देताना अॅड प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करुन आंदोलन होताना पोलिसांची ही भुमीका चुकीची असल्याचे सांगून त्यांनी लोकांशी व्यवस्थीत वागावे असे मत व्यक्त केले. तसेच आपण यासंदर्भात पोलिस अधिक्षकांशी बोललो असून यावेळी त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करु असे त्यांनी सांगितले. यावेळी गंगाराम मिनमीने म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारीत स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांना जलद न्याय मिळावा यादृष्टीने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे, जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आमच्या लढ्याला निश्चितपणे यश येईल व आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे असे मिनमीने म्हणाले.
यावेळी प्रकल्पग्रस्त यांच्या शिष्टमंडळात गंगाराम मिनमीने, संजय कुथे, राकेश जवके व अन्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.








Be First to Comment